पंकजा मुंडे यांच्या ट्विटरवरून ‘भाजप’ गायब, मनधरणीसाठी नेत्यांची धावाधाव

959

परळी या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातून  पराभव झाल्याने आणि पक्षानेच आपला गेम केला असा समज झाल्याने काहीशा नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटर हॅण्डलवरून भाजपची ओळख हटवली आहे. रविवारी पंकजा यांनी पुढे काय करायचे, कोणत्या मार्गाने जायचे असा सवाल करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चेला आता अधिकच उधाण आले आहे. यामुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून त्यांच्या मनधरणीसाठी राज्यातील नेत्यांनी धावाधाव सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते व चुलत भाऊ धनंजय मुंडे  यांनी पराभूत केले. भाजपचा गड असलेल्या मतदारसंघातच पराभव झाल्याने त्या नाराज आहेत. पक्षातीलच काही लोकांनी आपल्याविरोधात काम केल्याची त्यांची भावना झाल्याच बोलले जात आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी फेसबुककर लिहिलेल्या पोस्टमुळे यात भर पडलेली असतानाच सोमवारी त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून आपली भाजपची ओळख हटविली. यामुळे त्या लवकरच भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे.

पंकजा भाजप सोडणार नाहीचंद्रकात पाटील

पंकजा मुंडे या भाजपमध्ये राहाव्यात यासाठी भाजप नेत्यांनी त्यांच्या मनधरणीसाठी धावाधाव सुरू केली आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली व खुलासा केला. पंकजा मुंडे वेगळा विचार करताहेत ही केवळ अफवा आहेत. आमच त्यांच्याशी बोलण झाले आहे. भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडे यांची जयंती संदर्भातील माहिती देण्यासाठी त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरून कुणी वेगळा अर्थ काढू नये, असे पाटील म्हणाले.  

12 डिसेंबरला बोलणार – पंकजा मुंडे

आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भाचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार, अशी भावनीक फेसबुक पोस्ट पंकजा मुंडे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या