
यू टर्न मारण्याच्या नादात नशेबाज टेम्पोचालकाने तीन विद्यार्थिनींना चिरडल्याची घटना पळस्पेजवळ आज दुपारी घडली. या भीषण अपघातात एका दहावीच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघीजणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताची माहिती कळताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत मद्यधुंदचालकाला चांगला चोप दिला.
पनवेलजवळील पळस्पे गावाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या काजल गायकवाड, मिनल चौधरी व स्वप्नाली ठोंबरे (तिघीही रा. पुडावे गाव) या शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यावर घरी परतत होत्या. त्यावेळी अचानकपणे भरधाव आलेल्या टेम्पोने या 3 मुलींना जोरदार धडक दिली. या अपघातात काजल गायकवाड ही गंभीररीत्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघीजणी जखमी झाल्या असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन टेम्पोचालकाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीमध्ये सदर टेम्पोचालकाने मद्यपान केल्याचे समजते. घटनेनंतर संतप्त जमावाने धाव घेत चालकाला बेदम चोपले.
आणि सर्वांनाच रडू कोसळले
जखमी मुलींना पाहण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा वेट्टम या उपजिल्हा रुग्णालयात आल्या असता काजल गायकवाडचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसल्याने त्या रुग्णालयातच चक्कर येऊन कोसळल्या. अत्यंत हुशार असलेल्या काजलच्या अपघाती मृत्यू झाल्याने शाळेतील सर्वांनाच अक्षरशः रडू कोसळले.





























































