प्लॅस्टिक बंदीमुळे रद्दीचे भाव वधारले; किलोचे दर 20 रुपयांवर

चीनमध्ये रद्दी पुनर्वापरावर आलेली बंदी, देशभरात प्लॅस्टिकवरील बंदी अशा कारणांमुळे घराच्या अडगळीत पडणाऱ्या रद्दीला आता सोन्याचे दिवस आले आहेत. संगमेश्वरमध्ये रद्दीचे दर प्रथमच 20 ते 25 रुपये किलोवर पोहचले आहेत. आगामी काळात कागदाच्या मागणीत वाढ झाल्यास रद्दीचे दर आणखी वाढतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. दुर्लक्षित बाब म्हणून रद्दीकडे पाहिले जाते. आता रद्दीला 20 ते 25 रुपये दर मिळत असल्याने घराच्या अडगळीत साठवलेली रद्दी दुकानात नेण्यात येत आहे.

चीनमध्ये रद्दीच्या पुनर्वापरावर बंदी आल्यामुळे तिथे कागद बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे देशात सर्वत्र रद्दीची मागणी वाढतच आहे. तसेच देशभरात सुरु असलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या मोहिमेमुळे कागदी पिशव्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. या कारणांमुळे रद्दीची मागणी वाढत आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात रद्दीचा भाव 9 ते 12 रुपये किलो होता. आता रद्दीचे दर 20 ते 25 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत.

संगमेश्वर तालुक्यात रद्दी खरेदी करणारे सुमारे 25 व्यापारी असून रत्नागिरी जिल्ह्यात शेकडो व्यापारी आहेत. दुर्लक्षित असणारा रद्दीचा व्यवसाय लाखो रुपयांची उलाढाल करणारा ठरत आहे. एकेकाळी 9 ते 12 रुपये किलो या दराने आम्ही रद्दी खरेदी करत होतो. आता मात्र आम्हालाच रद्दी विक्रीतून चार पैसे अधिक मिळू लागल्याने मराठी पेपरची रद्दी 20 रुपये तर इंग्रजी पेपरची रद्दी आम्ही 25 रुपये किलो दराने खरेदी करत असल्याचे संगमेश्वर येथील रद्दी व्यावसायिक लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या