
मुंबईतील चुनाभट्टीत भरदिवसा झालेल्या गँगवारमध्ये गुंड पप्पू ऊर्फ सुमित येरुणकर याच्या हत्येचे धागेदोरे रायगड जिल्ह्यातील पेणमधील चुनाभट्टी गावात पोहोचले आहेत. पेणच्या चुनाभट्टी गावाच्या पुलाखालील नदीत या हत्येप्रकरणातील शस्त्रे फेकल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिली, त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून काही शस्त्रे हस्तगत केली आहेत.
मुंबईतील चुनाभट्टी येथे आझादनगर गल्लीत व्ही. एन. पुरव मार्ग येथे दुपारी दोन जण दुचाकीवरून आले. त्यांनी गजबजलेल्या वस्तीत अचानक अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी 16 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यात पॅरोलवर सुटलेला पप्पू ऊर्फ सुमित येरुणकर हा जागीच ठार झाला. या गोळीबारात आठ वर्षांच्या मुलीसह चारजण गंभीर जखमी झाले होते. सुमित ऊर्फ पप्पू येरुणकर याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 2016 मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.
या गँगवॉरप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी या हत्याकांडामध्ये वापरलेली हत्यारे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील दुरशेत गावाजवळ असलेल्या चुनाभट्टी गावाच्या पुलाखाली नदीत टाकल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा संयुक्त तपास मुंबई पोलीस, पेण पोलीस व दादर सागरी पोलिसांनी केला असता त्यांना पेणच्या चुनाभट्टी पुलाखालील नदीत दोन पिस्तूल सापडले. या गँगवॉरमध्ये आणखी काही शस्त्रे वापरली असावीत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. नदी परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होते.

























































