वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळीचे, साक्षात भूकैलास कलीयुगाचे

469

श्रीक्षेत्र परळी वैजनाथ बाराज्योर्तिलिंगापैकी एक वैद्यनाथ या नावाने प्रसिद्ध आहे. येथे हिंदू धर्माचे प्राचीन पाच संप्रदाय परंपरेने आहेत आणि देव देवतेचा परिवार जणु माहेरघर असलेले पवित्र आणि पावन स्थान परळी होय. 1 वैष्णव, 2 शैव, 3 शाक्त, 4 स्मार्त, 5 वैदिक संप्रदाय परंपरा आजतागायत जतन केलेले तीर्थक्षेत्र होय.भारताच्या नकाशात कन्याकुमारी ते उच्जैन दरम्यान एक मध्यरेषा ओढली तर ती परळी वैजनाथ क्षेत्रावरुन जाते .म्हणून परळीला मध्यरेखा पण म्हटले जाते.याविषयी एकमहान ज्योतिषाचार्य तथा गणितज्ञ भास्कराचार्य [इ.स.११४४-१२२३] यांनी सिध्दांतशिरोमणी आणि करण कुतूहल हे ग्रंथ लिहले आहेत. त्यांनी भारतवर्षाची मध्यरेखा कशी व कोणकोणत्या स्थानावरुन जाते हे वर्णित केलेले आहे.

“पुरीरक्षशां देवकन्याsथ कांची/सितःपर्वतःपर्यली वत्सगुल्यम//पुरी चोज्जयिन्यांन्हया गर्गराटम/कुरुक्षेत्र मेरुर्भुवोर्मध्य रेखा//”भारताची मध्यरेखा राक्षसांचीनगरी लंका ,कन्याकुमारी, कांची, शैलपर्वतआणि परळीवरुन मेरुपर्वतावर जाते असा परळीचा स्पष्टपणे उल्लेख आलेला आहे .

महानुभवपंथाचे लीळाचरित्रग्रंथाचे उत्तरार्धात [शके१२०८] लीळा चरित्र उ.४९७,५१२ दोनवेळा परळीचा संदर्भ येतो.,”सोरठी सोमनाथुःआवंढा नागनाथुःपरळीए वैजनाथः” आणि ,”वैजाए परळीयेची वाणीन…वैजनाथाःधावं धावंः” असा संदर्भ येतो.आनंदरामायणाचे ७व्या कांडातील विजय यात्रा प्रकरणात संदर्भ येतो.”योगेश्वरी वरामंबा द्रष्ट्वा हि अंबापुरास्थिताम//७५//वैजनाथं नमस्कृत्य वंजरा संगमंयथौ/नागेशंच विलोक्याय विमानेन स राघवः//”परळीतर प्रभुरामचंद्राचे पदस्पर्शाने पावन झालेली आहे.

महानुभवकवी डिंभ याने ज्योर्तिलिंगाची यादी दिली यात परळीचा उल्लेख आहे.याशिवाय वारकरी संत नरहरी सोनार यांनी , “सत्यज्योर्तिलिंगे बारा…/ नागनाथ अमृतोदकीं / विश्वजन केले सुखी / परळीवैजनाथसुखी / सुकृत साचे जन्माचे //” म्हटले आहे .

परळी या नगरीस प्रत्येक मन्वतरांत नानाविध नावे होती. स्वांयभुवमन्वतरात -उत्तमक्षेत्र, स्वारोचिषमन्वतरात-तिर्थराज,उत्तममन्वतरात- नारायणक्षेत्र,तामसमन्वतरात-ब्रम्हक्षेत्र,रैवतमन्वतरात-अमृतेश्वरक्षेत्र,चाक्षुषमन्वंतरात-वेदक्षेत्र, वैवस्वतमन्वतरात-प्रभाकरक्षेत्र नावाने विख्यात होय. प्रत्येक युगात सुप्रसिद्ध असलेल्या परळीला कृतयुगात-जयंतीक्षेत्र,त्रेतायुगात-वैजयंतीक्षेत्र,द्वापारयुगात-मध्यरेखा कांतीपुरी,कलीयुगात-परळीक्षेत्रास अशी नावे होती .परळी वैजनाथ हे महाराष्ट्रात मराठवाडा विभागात आहे आणि सांप्रत झारखंडराज्यात वैद्यनाथ म्हणून देवघर येथे पण प्रशिध्द आहे.दोन्ही पैकी खरे कोणते की खोटं कोणते असा ठरविण्याचा हेतू नसून फक्त परळीचे वास्तव संशोधकीय वृत्तिने प्राचिनत्व आणि पौराणिक ऐतिहासिक दस्त अथवा लोककथेचा संदर्भ देणे हाच एकमेव हेतू.माझ्या लेखणीचा धर्म म्हणजे सत्य प्रकटीकरण होय.

आपली प्रतिक्रिया द्या