परळीत घरातच केला महिलेचा जबरदस्ती गर्भपात, डॉक्टरसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुसरी मुलगी नको म्हणून नराधम पतीने व सासरच्यांनी एका महिलेचा घरच्या घरी बळजबरीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बीडमधील परळीत उघडकीस आली आहे. या महिलेने डॉक्टर, तिचा पती व सासूविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे बीडमध्ये अजूनही बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान चाचणी होत असल्याचे समोर आले आहे.

सदर महिलेचे 2020 साली नारायण अंकुश वाघमोडे यांच्यासोबत लग्न झाले होते. नारायण परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीवर आहे. लग्न झाल्यापासूनच पती नारायण आणि सासू छाया तिचा मारहाण, शिवीगाळ करून छळ करत. तिला माहेरच्यांशी देखील बोलू देत नसत. गेल्या वर्षी पीडित महिलेने एका मुलीला जन्म दिला होता. आता ती पुन्हा गरोद होती. मात्र यावेळेस पुन्हा मुलगी नको म्हणून तिच्या पती व सासरच्यांनी तिची जबरदस्ती डॉ. स्वामी यांच्याकडून तिची गर्भलिंग निदान चाचणी केली. त्यावेळी त्यांनी तिच्या गर्भात मुलगी वाढत असल्याचे समजले. त्यानंतर तिचा गर्भपात करण्याचे त्यांनी ठरवले. मात्र महिलेने गर्भपात करण्यास नकार दिला. जुलै महिन्यात महिला आजारी पडली. तिला ताप, उलट्याचा त्रास होऊ लागला. 15 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सासूचा मेहुणा प्रकाश कावळे हा पुन्हा डॉ. स्वामीला घेऊन घरी आला. यावेळी सुद्धा पती, सासू, डॉक्टर आणि प्रकाश यांच्यात गर्भपात करण्यासंदर्भात कुजबुज सुरू होती. त्यानंतर डॉ. स्वामीने पुन्हा सोनोग्राफी केली. तापासाठी इंजेक्शन देत आहे असे सांगत त्याने तिला गर्भपाताचे इंजेक्शन टोचले आणि निघून गेला. त्यानंतर एक-दिड तासाने तिला पोटदुखीचा त्रास सुरु झाला आणि विश्वासघाताने गर्भपाताचे इंजेक्शन टोचण्यात आल्याचे तिने ओळखले. महिलेने ताबडतोड पुणे येथे राहणाऱ्या भावाला मेसेज करून सर्व माहिती दिली. माझा जबरदस्तीने गर्भपात करणार आहेत, तू लवकर ये असेही तिने भावाला सांगितले.

इंजेक्शन दिल्यानंतर महिलेला खूप त्रास होत होती. त्यामुळे 16 जुलै रोजी पहाटे 1.30 वा. डॉ. स्वामी पुन्हा तिच्या घरी आला. त्याने महिलेची तपासणी केली. पिशवीला छिद्र करून गर्भ काढावा लागेल असे त्याने सांगितले. यावेळी देखील माझा गर्भपात करू नका अशी विनवणी महिला वारंवार करत होती. मात्र, सर्वांनीच तिच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सासूने तिचे हात पकडले आणि डॉ. स्वामीने अक्षरशः गर्भ कापून बाहेर काढला. त्यानंतर पती, सासू आणि प्रकाश कावळे हे विल्हेवाट लावण्यासाठी तो गर्भ घेऊन निघून गेले. झालेल्या प्रकाराबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी महिलेला दिली.

चौघांवर गुन्हा दाखल

16 जुलै रोजी सकाळी भाऊ आला. पती, सासू यांना विनंती करून रात्री तो बहिणीला घेऊन पुण्याला गेला. गर्भपात झालेला असल्यामुळे तिथेही तिला खूप शारीरिक त्रास झाला. अखेर तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराविरोधात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रक्षा कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे..