
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिस निरीक्षक अनूप डांगे यांनी परमबीर यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी)खुली चौकशी करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करणाऱया परमबीर सिंह यांच्यावरच आता भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. अनूप डांगे यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना पत्र लिहून परमवीर यांच्या विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे.
यापूर्वी अँटिलिया प्रकरणातील तपासात अपयशी ठरल्याच्या आरोपावरुन गृह विभागाने सिंह यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. सिंह यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरुन 17 मार्च रोजी हटवण्यात आले होते. सिंह सिक लिव्हवर असल्यानं त्यांची विभागीय चौकशी रखडली आहे. 30 एप्रिलपासून ते रजेवर आहेत. पाठीच्या दुखण्याने बेजार असल्याने वैद्यकीय रजा आणखी वाढवून मिळावी, अशी विनंती परमबीर यांनी गृहविभागाला केली आहे.
परमबीर यांच्याविरुद्धही भ्रष्टाचार, खंडणीच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची सीआयडी आणि अन्य यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. पण आजारपणाचं कारण देत ते एकदाही चौकशीला हजर राहिलेले नाहीत.































































