
चांदिवाल आयोगापुढे सुनावणीसाठी आलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या तासभर झालेल्या भेटीमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणावर अनिल देशमुख यांच्या वकिलानेही आक्षेप नोंदवला होता. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली असून एखादे प्रकरण सुरू असताना त्यातील आरोपींना भेटता येत नाही. या भेटीची चौकशी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना याविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, एखाद्या प्रकरणातील आरोपी आहे आणि तो न्यायालयीन कोठडीत आहे. अशा आरोपींना एकमेकांना भेटता येत नाही. असे असताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भेट कशी झाली याची चौकशी केली जाईल. या प्रकरणातील आरोपी बाहेर अशा प्रकारे कुणाशीही चर्चा करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
सरकारी गाडीचा वापर करणे गैर
परमबीर सिंह यांनी सरकारी गाडीचा वापर करणेही गैर असल्याचे वळसे-पाटील म्हणाले. परमबीर सिंह यांनी अद्याप पदभार घेतलेला नसून त्यांच्या निलंबनाबाबतही कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावर निर्णय होण्यापूर्वीच अशा प्रकारे भेटीगाठी करणे अयोग्य असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
























































