
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटाचे काम अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत सुरू आहे.पण तरीही या घाटाचे काम मे 2022 पर्यंत पूर्ण होईल. तसेच परशुराम घाट ते आरवलीपर्यंतच्या या 34 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम 31 मे 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.
रत्नागिरी जिह्यातल्या परशुराम घाटातील चौपदरी रस्त्याच्या संदर्भात भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली. कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर सभागृहात सुमारे एक तास चर्चा झाली. यावेळी भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, धोकादायक झालेला परशुराम घाट, सततच्या दुर्घटनांमुळे पेढे गावातील ग्रामस्थ व घाटातील सुरक्षेचा प्रश्न याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
परशुराम घाटात बोगदा
कशेडी घाटात 17 किमी लांबीचा बोगदा होत आहे. परशुराम घाटातील अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन या घाटात बोगदा बांधण्याची सूचना शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी केली.
पीर लोटे ते कळंबसे पर्यायी मार्ग
घाटाचा रस्ता बंद झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून पीर लोटे ते कळंबसे फाटय़ापर्यंतच्या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा देऊन सिमेट काँक्रीटचा रस्ता करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
ट्रामा केअर सेंटर उभारा
मुंबई-गोवा महामार्गावर प्रत्येक 100 ते 200 किमी अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची सूचना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. ट्रॉमा केअर सेंटर उभारल्यास अपघातग्रस्तांचे जीव वाचतील, असे प्रभू म्हणाले. तर ओणी येथे ट्रॉमा केअर सेंटरची मागणी राजन साळवी यांनी केली.
नितीन गडकरींमार्फत पाहणी
मुंबई-गोवा महामार्गावरील किती टक्के रस्ता पूर्ण झाला त्याची आकडेवारी अशोक चव्हाण यांनी सादर केली. त्यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. सरकारी अधिकारी मंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यापेक्षा पेंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना या महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आमंत्रित करा, अशी सूचना केली. अशोक चव्हाण यांनी ही सूचना मान्य केली. त्यावर आपण त्यांना आमंत्रित करू, असे आशिष शेलार म्हणाले.
































































