
विना मास्क फिरणारे नागरिक, सामाजिक अंतराचा उडालेला फज्जा, वारंवार आवाहन करून तसेच निर्बंध लावूनही मिळत नसलेला प्रतिसाद पाहून अखेर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे स्वतःच रस्त्यावर उतरले. आज सकाळी बाजारपेठेत फिरून त्यांनी व्यापारी विक्रेते नागरिकांना आवाहन करत नियम पायदळी तुडविणार्यांना त्यांनी दंडाचा दणका दिला. तसेच विना मास्क फिरणार्या अनेकांची आरटीपीसीआर टेस्टसाठी रवानगी केली.
जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागलेला आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अनेक निर्बंध लागू केले आहेत. विना मास्क फिरू नये, सुरक्षित अंतर राखावे, असे नागरिकांना वेळोवेळी आवाहन करीत आहेत. अंमलबजावणी यंत्रणेला देखील दंडात्मक कारवाईचे आदेश देखील दिलेले आहेत. तरी सुद्धा यंत्रणेकडून केल्या जाणार्या कारवाईचा परिणाम दिसून येत नाही.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुगळकर हे आज रस्त्यावर उतरले. विसावा कॉर्नर, गांधीपार्क गुजरी बाजार, शिवाजी चौक, बसस्थानक आदी परिसरात जाऊन त्यांनी विना मास्क फिरणारे नागरिक, व्यापारी, विक्रेते यांना सुरक्षा नियमांची जाणीव करून दिली. अनेक दुकानांना त्यांनी भेटी देऊन विनंती केली. सॅनिटायझर ठेवा, स्वतःसह नोकर-चाकरांना मास्क अनिवार्य करा, सुरक्षित अंतर याची खबरदारी घ्या अशी सूचना ते देत होते. जिल्हाधिकार्यांचा अचानक आलेल्या ताफ्याने अनेकांची धांदल उडाली.
दोन व्यापार्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड
दोन व्यापार्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड लावल्याची माहिती महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरून विना मास्क भरणार्या काहींच्या आरटीपीसीआर चाचण्या देखील करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदी प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर उतरून कारवाई करीत आहेत.



























































