
गेल्या 15 दिवसांपूर्वी पुण्यातून परतलेल्या एका 21 वर्षीय युवकास कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाला असून याप्रकाराने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सर्वत्र संचारबंदीचे कडक अंमलबजावाणी सुरु करण्याचे आदेश देण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे परभणी जिल्हा हा ग्रीन झोनमधून आऊट झाला आहे.
लॉकडाऊन पहिल्या टप्प्यात 21 दिवस या जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणारा एकही रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागाने या संदर्भात कमालीची दक्षता बाळगली होती. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. तसेच जिल्ह्यातील संपूर्ण वाहतूक थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन कसोसीने प्रयत्न करीत होते. जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही, असे चित्र असतानाच परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात संशयीत म्हणून दाखल झालेला 21 वर्षीय तरुणास कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याचा अहवाल आज गुरुवारी सकाळी 11 वाजता यमिळाला.
सदरील कोरोनाग्रस्त 15 दिवसांपूर्वीच पुण्याहून परभणीला परतला होता. पुण्याहून आल्यानंतर सर्दी, खोकल्याच्या त्रासामुळे त्याने परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली होत. यानंतर त्याच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. अखेर त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर त्या रुग्णाची स्वतंत्र व्यवस्था केली असून त्याच्यासह त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या तरुणाच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्यात येत असून तो राहत असलेल्या भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त आढळून आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता, शिस्त पाळावी व घरबाहेर न पडता घरी सुरक्षीत रहावे, असे आवाहन केले.





























































