
लातूर जिल्हा सिमेच्या हद्दीजवळ गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगावपासून 2 कि.मी. अंतरावर असलेल्या एका शेत आखाड्यावर सोमवारी पहाटे 8 ते 10 दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत 2 महिलांसह एका पुरुषाला बेदम मारहाण केली. दरोडेखोरांनी 1 लाख रुपयांचा मुद्देमालही लुटला.
गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथून 2 कि.मी. अंतरावर असलेल्या बालाजी सेल्स ईस्सार पेट्रोल पंप शेजारील आखाड्यावर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. मारोती आडे, जालींदर आडे या शिल्पकार बंधुंच्या आखाड्यावर धुमाकूळ घालत आखाड्यावरील अनुसयाबाई दत्तराव आडे (65), केराबाई प्रकाश राठोड (55), सालगडी संजय पाटील (60) यांना दरोडेखोरांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. आखाड्यावरील त्यांच्या घरातील लोखंडी पेटी फोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, बोरमाळ, चांदीचे कडे असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला.

दरोडेखोरांनी 15 ते 20 मिनीटे धुमाकूळ घातला. सोमवारी सकाळी घरातील व्यक्ती आखाड्यावर आल्याने घटना उघडकीस आली. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपान शेळके, पिंपळदरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी, श्वानपथक, स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी यांनी भेट देत पाहणी केली. दरोडेखोरांनी एका महिलेजवळून चोरलेला मोबाईल नांदेड जिल्ह्यात बंद झाला. चोरी आणि दरोड्यांच्या घटनामुळे राणीसावरगावात भीतीचे वातावरण पसरले आहे.


























































