
शहरापासून जवळच असलेल्या खरबडा येथील गोदापात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या दोन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले असून दोघांना अटक केली आहे. तर अन्य आठ जण फरार झाले आहेत. गंगाखेड पोलिसांनी रविवा पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या संधीचा फायदा घेत वाळू माफियांनी गोदावरी पात्रात वाळू उपसा करण्याचा सपाटा सुरू केला आहे. रविवारी खरबडा येथील गोदावरी पात्रात बेकायदा वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरीत असल्याची माहिती पहाटे ४ वाजता पोलीस निरीक्षक शेख यांना मिळाली. तेव्हा पोलीस शिपाई पठाण, सूर्यवंशी, शे.उमर यांच्यासह ते खाजगी वाहनाने खरबडा येथील गोदावरी पात्रात उतरले असता मजूर लावून वाळू उपसा करीत सहा ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याचे दिसून आले. पोलीस येताच अनेकांनी पळ काढला. पण दोन ट्रॅक्टर पकडण्यात यश आले. यामध्ये ट्रॅक्टर चालक मालक देविदास पिराजी माळगे व ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.22 ए.एम. 0889) मालक चालक लिंबाजी उर्फ दिपक रामकिशन माळगे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आठ जणांचा पोलीस शोध घेत आहे.






























































