परभणीतील राणी सावरगावात चोरट्यांचा धुमाकूळ; सहा अडत दुकाने फोडली

580

परभणीतल्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील पालम मेनरोडवरील आडत व इतर मिळून सहा दुकाने फोडून चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून पोलीस तपासात गुन्हा उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.

गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील पालम मेनरोड वरील बसवेश्वर फर्टिलायर्स, सिद्धेश्वर ट्रेडर्स, श्रीकांत ट्रेडर्स, गिरी बालाजी किराणा दुकान, पुष्पेश ट्रेडर्स, महाराष्ट्र ट्रेडर्स अशी एकूण सात फोडून चोरटे पसार झाले. यामध्ये महादेव टाले, नवनाथ जाधव, माधव जाधव, स्वप्निल कटकमवार, अविनाश धुळे, सय्यद अश्फाक या व्यापाऱ्याची ही दुकाने आहेत. 7 मार्चला मध्यरात्रीनंतर चोरीची ही घटना घडली आहे. चोरट्यांनी लोखंडी गजाने शटर व कूलपे तोडून आत प्रवेश केला. त्यापूर्वी दोन दुकानावरील सीसीटीव्ही कॅमेरे त्यानी तोडले होते. या चोरीमध्ये 10 ते 15 चोरटे सामील असण्याचा अंदाज आहे. शटर तोडण्यासाठी वापरलेला अडीच फुटांचा लोखंडी गज घडनास्थळी टाकून चोरटे पसार झाले. यामध्ये आडत दुकानदारांचे 5 लाख चिल्लर व नोटा चोरण्यात आल्या. तर किराणा दुकानातील अडीच लाखांपैकी रोख 50 हजार व काजू, बदाम, सिगारेट व तंबाखू आदी वस्तू (दीड लाख रुपये) पळवल्या आहेत. चोरी झालेल्या एका किराणा दुकानामध्ये अनेक कॅमेरे होते. त्यापैकी बरेच बंद केल्यानंतरही एक-दोन कॅमेय़ऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही फूटेजवरून गुन्हा उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पिंपळदरी पोलीस ठाण्याचे एपीआय राजकुमार पुजारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनाम्याचे काम सुरू होते. तर स्कॉर्ट पथकाचे सुरेश डोंगरे, फॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाला गंगाखेडचे डीवायएसपी लंजिले यांनीही भेट देऊन श्वानपथक दाखल होणार असल्याची माहिती दिली. चोरट्यांच्या धुमाकुळाने व्यापाऱ्यांमध्ये दहशत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या