डाकिया ‘ड्रोन’से डाक लाया… माथेरानहून पार्सल उडाले; 15 मिनिटांत कर्जतला पोहोचले, राज्यातील पहिला हायटेक प्रयोग यशस्वी

खुशी का पयाम कही, कही दर्दनाक लाया, डाकिया डाक लाया.. असे म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घरापर्यंत टपाल सेवा पुरवणारे पोस्ट खाते आता हायटेक झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली असून आज कर्जत ते माथेरान व माथेरान ते कर्जत यादरम्यान पार्सलचा ड्रोन यशस्वीपणे उडवण्यात आला. राज्यातील पहिला प्रयोग यशस्वी होताच उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. आता ड्रोनद्वारे कमीत कमी वेळेमध्ये पार्सल ग्राहकांना मिळणार आहे.

एकेकाळी पोस्टमन घोडय़ावरून यायचा. नंतर तो सायकलवरून येऊ लागला. कालांतराने त्याची जागा दुचाकींसह मोठय़ा गाडय़ाने घेतली. एआयच्या जमान्यात दळणवळण फास्ट झाले असून त्याचा प्रत्यय आज कर्जत व माथेरानवासीयांना आला. आज दुपारी 4 वाजून 37 मिनिटांनी कर्जतमधील पोस्ट ऑफिसच्या इमारतीवरून ड्रोन उडवण्यात आला. त्यात 10 किलो वजनाचे पार्सल ठेवण्यात आले होते. हा ड्रोन 4  वाजून 52 मिनिटाने माथेरानमधील पोस्ट ऑफिसच्या जवळ यशस्वीपणे उतरला. तेव्हाही हिप हिप हुर्रे म्हणून नागरिकांनी आपला आनंद व्यक्त केला.

खासगी कुरियर सर्व्हिसला देणार टक्कर

सध्याच्या काळात आपले पार्सल लवकरात लवकर पोहोचावे असे अनेकांना वाटते. त्यामुळे पोस्टाऐवजी अनेकजण खासगी कुरियर सर्व्हिस घेणे पसंत करतात. मात्र पोस्ट विभागाच्या या अत्याधुनिक ड्रोन सेवेमुळे ग्राहकांना जलदगतीने सेवा उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

कर्जत ते माथेरान हे अंतर गाठण्यासाठी अंदाजे दीड तासाचा वेळ जातो. मात्र ड्रोनमुळे 15 मिनिटात पार्सल पोहोचल्याने ही चाचणी यशस्वी झाली. n माथेरानहून 5 वाजून 27 मिनिटांनी हा ड्रोन 9 किलो 800 गॅम वजन घेऊन पुन्हा उडाला. तो कर्जतच्या पोस्ट ऑफिसजवळ 5 वाजून 42 मिनिटांनी सुखरुप पोहोचला.