
एफ/दक्षिण आणि ई विभागात चार किलोमीटरहून जास्त लांबीच्या 100 वर्षे जुन्या दोन जलवाहिन्या बदलण्याचे काम शुक्रवार सकाळी 10 वाजल्यापासून ते शनिवार सकाळी 10 वाजेपर्यंत असे 24 तास सुरू राहणार आहे. त्यामुळे परळ, शिवडी आणि नायगावमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या परिसरातील रहिवाशांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
- रुग्णालये – 24 तास पाणीपुरवठा बंद – केईएम रुग्णालय, टाटा रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालय
- शिवडी (पूर्व) – शिवडी फोर्ट रोड, गाडी अड्डा, शिवडी कोळीवाडा (दि. 11.09.2020 रोजी रात्री 7.00 ते रात्री 9.30 पर्यंत)
- शिवडी (पश्चिम) – आचार्य दोंदे मार्ग, टी. जे. रोड, झकेरीया बंदर रोड, शिवडी क्रॉस रोड (दि. 11.09.2020 रोजी संध्याकाळी 4.30 ते संध्याकाळी 7.00 पर्यंत)
- गोलंजी हिल पाणीपुरवठाअ) परळगाव – गं. द. आंबेकर मार्ग 50 टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परेल व्हिलेज रोड, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वांळिभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड (दि. 11.09.2020 रोजी दुपारी 1.45 ते दुपारी 04.45 पर्यंत)
ब) काळेवाडी – परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा रोड, मिंट कॉलनी, राम टेकडी (दि. 11.09.2020 रोजी रात्री 8.30 ते रात्री 11.30 पर्यंत)
क) नायगाव – जेरबाई वाडिया मार्ग, प्रिंग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेटये मार्केट, भोईवाडा गाव, हाफकिन (दि. 12.09.2020 रोजी सकाळी 7.00 ते सकाळी 10.00 पर्यंत)
- अभ्युदयनगर (दि. 12.09.2020 रोजी सकाळी 2.15 ते सकाळी 6.00 पर्यंत) अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग
- ई विभाग, म्हाडा इमारत, फेरबंदर नाका, राणीचा बाग परिसर, घोडपदेव नाका.
(ई विभाग दि. 11.09.2020 रोजी सायंकाळी 06.45 ते सायंकाळी 09.00)
अभ्युदय नगरात पाण्याची बोंब
काळाचौकी येथील अभ्युदय नगरात गेला आठवडाभर पाण्याची बोंब सुरू आहे. इमारत क्र. 7 ते 16 या टेकडीवरील इमारती ओळखल्या जातात. नेमके या इमारतींमध्ये पाणी पोहचत नाही. कोविड संकटात स्वच्छता राखावी हे खरे असले तरी घरात पाणीच नाही तर शरीराची स्वच्छता राखणार कशी, असा येथील रहिवाशांचा सवाल आहे.
पाणी नाही म्हणून अनेक रहिवाशांनी स्वखर्चाने खासगी टँकर्स मागवले. त्यासाठी 3 हजार रुपयांची पदरमोड केली. शिवसेना नगरसेवक दत्ता पोंगडे यांनी महापालिकेच्या जल विभागातील अधिकारी आणि रहिवाशांची बैठकही घेतली. पण जल विभाग सुस्तावलेला आहे. या विभागातील अधिकाऱयांच्या तोंडावरच पाणी मारून त्यांना उठवण्याची वेळ आली आहे, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. कारण अधिकारी आश्वासन देऊन गेले, नंतर मात्र पाण्याच्या नावाने ठणाणाच आहे.
निद्रानाशाचा विकार
अभ्युदय नगरमध्ये पाणी येण्याची वेळ अपरात्री 3 वाजताची आहे. त्यामुळे येथील बहुतांश रहिवाशांना निद्रानाशाचा विकार जडल्याची धक्कादायक माहिती काही स्थानिक खासगी डॉक्टरांनी दिली. अपुरी झोप, कोरोनाचे टेन्शन यामुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडल्याचे ते म्हणाले. पाणी सोडण्याची वेळ बदला, अशी आता रहिवाशांची मागणी आहे.


























































