
सामना प्रतिनिधी । मुंबई
मध्य रेल्वेवरील दुसरे दादर म्हणून ओळखले जाणाऱया परळ स्थानकात टर्मिनस फलाटांची निर्मिती झाल्यानंतर या स्थानकाच्या शेजारीच परळ लोको वर्कशॉपच्या जागेवर लांबपल्ल्याच्या गाडय़ांना सोडण्यासाठी परळ टर्मिनस बांधण्यात येत आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांना हे लांबपल्ल्याचे टर्मिनस जोडले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात परळमधून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटू शकतात.
परळ लोको वर्कशॉपच्या 14 हेक्टर जागेवर नवे लांबपल्ल्याचे टर्मिनस बांधले जात असून भविष्यात पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेस ते उपयोगी पडेल. उपनगरीय लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूक स्वतंत्रपणे करण्यासाठी हे टर्मिनस फायदेशीर होणार आहे. या वर्कशॉपमध्ये नॅरोगेजपासून अनेक लांबपल्ल्याच्या गाडय़ांची इंजिने तयार केली जात आहेत. तसेच 40 टन वजनाची क्रेन तसेच लांबपल्ल्याच्या डब्यांची डागडुजीही येथे केली जाते. या कारखान्यातील कर्मचाऱयांची मध्य रेल्वेच्या अन्य विभागांत बदली केले जाणार आहे.
परळ टर्मिनस का गरजेचे
मध्य रेल्वेच्या दादर टर्मिनस येथे लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी योग्य सोयीसुविधा नाहीत. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस अडगळीत आहे. ठाण्यातही दादरप्रमाणेच उपनगरीय लोकलच्या फलाटांवरच लांबपल्ल्याच्या गाडय़ा थांबवाव्या लागत आहेत. सीएसएमटीत क्षमता पुरेपूर वापरली जात असल्याने दक्षिण मुंबईपासून उपनगरात टर्मिनस वाढविण्याची योजना आहे. त्यामुळे परळ टर्मिनस उभारले जात असून पनवेल आणि कल्याण येथेही अनुक्रमे कोचिंग कॉम्प्लेक्स, तसेच यार्ड रिमॉडेलिंगचे काम करण्यात येत आहे.
असे असणार लांबपल्ल्याचे टर्मिनस
परळ वर्कशॉपची जागा 14 हेक्टर
टर्मिनसचा खर्च 190 कोटी
29 मेल-एक्स्प्रेस सुटणार

























































