
वडिलोपार्जित संपत्तीसाठी भावाभावांमध्ये भांडणे होतातच. प्रत्येकालाच समसमान हिस्सा हवा असतो. पण बहुतांश ज्येष्ठांना भावंडांपैकी एखाद्यानेच सांभाळलेले असते. अशावेळी आपला सांभाळ करणाऱ्या मुलाला जास्त संपत्ती देण्याचा अधिकार ज्येष्ठांना आता मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1970 साली सुरू झालेल्या एका खटल्याबाबत निर्णय देताना म्हटले की, मात्र यामुळे एखाद्याच मुलाने पालकांच्या वृद्धत्वाचा फायदा घेत संपत्ती आपल्या नावावर करून घेतली असे यावरून मानले जाणार नाही. भावाभावांमध्ये वडिलोपार्जित संपत्तीवरून सुरू असलेल्या एका खटल्यात न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी दिला.
ही केवळ ‘जबाबदारी’ नाही
न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, आईवडिलांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे. मात्र एकापेक्षा जास्त मुले असतील तर कुणी सांभाळ करायचा हा प्रश्न उभा राहतो. अशावेळी पालकांच्या सांभाळाकडे न्यायालय ‘जबाबदारी’ म्हणून पाहात नाही. आईवडिलांचा सांभाळ एखाद्या मुलाने संपत्तीसाठी केला असे न्यायालय कधीच म्हणणार नाही. कुठल्याही परिस्थितीत वृद्ध आईवडिलांचा सांभाळ कुणीतरी करायलाच हवा, असेही न्यायालयाने सांगितले.



























































