
नीट-यूजी परीक्षेची प्रक्रिया कशी हाताळायची, याबाबत परीक्षा पेंद्रांवरील निरीक्षकांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयींना व मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी आधीच परीक्षेच्या ताणतणावांचा सामना करत असतात. त्यांच्या त्रासात यामुळे भर पडते. त्यामुळे परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना व निरीक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (एनटीए) केली आहे. काही परीक्षा पेंद्रांवर साधी घडय़ाळाचीही सोय नसते. त्यामुळे प्रत्येक परीक्षा हॉलच्या भिंतीवर किमान एक घडय़ाळ असावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. 4 मे रोजी नीट-यूजी होणार आहे.
परीक्षा पेंद्रांवरील अप्रशिक्षित कनिष्ठ कर्मचारी पेपराचे वाटप, संकलन आणि विद्यार्थ्यांच्या हजेरीच्या प्रक्रियेत गोंधळ घालतात. अनेकदा विद्यार्थ्यांची हजेरी, बायोमेट्रिक आणि व्हिडीओग्राफीची प्रक्रिया परीक्षेची वेळ सुरू झाल्यानंतरही चालूच असते. या सगळय़ामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप होतो.
नियमानुसार परीक्षा सुरू व्हायच्या पाच मिनिटेआधी ओएमआर शीट आणि प्रश्नपत्रिका देणे आवश्यक आहे, परंतु काही केंद्रांवर हा नियम धाब्यावर बसवला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो. म्हणून सर्व केंद्रांवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आणि निरीक्षकांना परीक्षा प्रक्रियेचे योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पेपर कोणत्याही अडचणीशिवाय लिहिता येईल, अशी मागणी नीट प्रवेशोच्छुक पालकांच्या प्रतिनिधी सुधा शेणॉय यांनी एनटीएकडे केली आहे.