परिचारकांच्या बडतर्फीचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

जवानांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह विधानामुळे निलंबित करण्यात आलेले भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या विधान भवन परिसरातील प्रवेश बंदी उठवणे, तसेच त्यांच्या बडतर्फीच्या प्रस्तावावर गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

परिचारक यांनी दोन वर्षांपूर्वी जवानांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यांच्या  विधानाची दखल घेत त्यांना विधान परिषदेतून दीड वर्षासाठी निलंबित केले होते. गेल्या वर्षी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले, परंतु शिवसेना आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत त्यास विरोध केला होता. शिवसेना गटनेते ऍड. अनिल परब यांनी परिचारक यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. सभापतींनी या प्रस्तावावरील निर्णय राखून ठेवतानाच परिचारकांच्या सभागृह प्रवेशावरील बंदी कायम ठेवली होती. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परिचारक यांना विधान भवनाच्या प्रांगणात येण्यास परवानगी मिळावी यासाठी भाजप आमदारांनी सभापतींना पत्रे पाठवली होती. त्याची माहिती देत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी परब यांनी दिलेला परिचारकांच्या बडतर्फीचा प्रस्ताव अस्वीकार्य असल्याचे सांगितले. यासंदर्भातील निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत होईल असे त्यांनी स्पष्ट केले.