रब ने बना दी जोडी…राघव-परिणीती विवाह बंधनात

आपचे खासदार राघव चढ्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा रविवारी लग्नबंधनात अडकले. दोघांचे लग्न पंजाबी रितीरिवाजानुसार उदयपूर येथील द लीला पॅलेसमध्ये शाही पद्धतीने पार पडले. नवदांपत्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीय, मित्रमंडळींसह चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता होती. शनिवारी मेहंदी आणि संगीत असे विधी पार पडल्यानंतर रविवारी सकाळपासून त्यांच्या लग्नाच्या मंगलविधींना सुरुवात झाली. हॉटेलमध्ये एण्ट्री करणाऱ्या पाहुण्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर ब्लू कलरची टेप लावण्यात आली. जेणेकरून कोणीही लग्न सोहळ्यातील व्हिडीओ, फोटो घेऊ शकणार नाही. हॉटेल लीलाच्या जेटीपासून संपूर्ण उद्यान परिसर रंगीबेरंगी फुले, पडदे आणि विद्युत रोषणाईने सजवला होता.
हॉटेल ताज लेक पॅलेस येथून दुपारी सेहराबंदीनंतर राघव चढ्ढा यांच्या लग्नाची मिरवणूक सजवलेल्या बोटीने लीला पॅलेसमध्ये पोहोचली. सायंकाळी चारच्या सुमारास हॉटेलच्या लॉनमध्ये दोघांनी सात फेरे घेतले. राघव यांनी क्रीम रंगाची शेरवानी तर परिणीतीनेही त्याच रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. त्यानंतर रात्री ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, हरभजन सिंग, गीता बसरा, सानिया मिर्झा, मनीष मल्होत्रा अशा अनेक दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती.