
वसुलीला आधी सेवा मात्र काहीच नाही अशीच परिस्थिती परळी महावितरणची झालेली दिसून येत आहे. शहरात महावितरणने वीजपुरवठ्याचे पुरते तीन तेरा वाजवले आहेत. नेहमीच आपल्या कारभारामुळे सर्वदूर परिचित असलेल्या महावितरण ने सणासुदीच्या काळात पण आपली यंत्रणा निष्क्रिय असल्याचे दाखवून दिले आहे.विशेष म्हणजे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यानी पण दुर्लक्ष केले काय असे चित्र दिसू लागले आहे.
शनिवार रोजी ऐन धनत्रयोदशी दिवशीच सकाळी 7 वाजल्यापासून परळी शहराचा वीजपुरवठा ठप्प झाला. 11 वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला मात्र दिवाळीचा सण असतानाही लाईट नसल्याने मात्र परळी परिसरातील नागरिकांची चांगलीच धांदल उडालेली दिसून आली.
दरम्यान महावितरणने दिलेल्या फ्यूज कॉल क्र. 2-3 तास व्यस्त असल्याचे दिसून आल्याने नागरिकांचा संपर्क न शकल्याने वीजपुरवठा कधी पूर्ववत कधी होणार याबाबत माहिती न भेटू शकल्याने त्यांचा संताप होत होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.शिवाय आता 10 वी 12 वीची परीक्षा काही महिन्यांवर आहे. मात्र या शिक्षणाकरिता वीजपुरवठा असणे गरजेचे आहे. मात्र सतत खंडित होणारा वीजपुरवठा ही विद्यार्थ्यांचा चिंतेचा विषय होऊ लागला आहे.
आज तर संपूर्ण परळी शहरासह परिसरातील वीजपुरवठा बंद होता. याबरोबर काही ठिकाणी दररोज लाईट नसतात याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. परळी महावितरणचे अधिकारी नेमके असतात तरी कुठे अशी चर्चा होत आहे.

























































