अवघा देश हादरला; नव्या संसदेची सुरक्षा भेदली, लोकसभेत 2 तरुणांचा स्मोकबॉम्बचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज 22 वर्षे पूर्ण होत असतानाच नव्या संसद भवनाची सुरक्षा भेदून लोकसभेत स्मोकबॉम्बचा हल्ला करण्यात आल्याने अवघा देश हादरला असून जगभरात हिंदुस्थानची नाचक्की झाली आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असतानाच जय भीम, जय भारत! तानाशाही नहीं चलेगी!! भारत माता की जय अशा घोषणा देत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी टाकली आणि स्मोकबॉम्ब फोडला. त्यामुळे सभागृहात पिवळा आणि हिरवा धूर पसरला. अचानक झालेल्या या हल्ल्याने खासदारांची पळापळ झाली तर काही खासदारांनी धाडस दाखवून दोन्ही तरुणांना पकडून बेदम चोप देत सुरक्षा यंत्रणांच्या हवाली केले. दरम्यान, 6 जणांनी हा कट रचल्याची माहिती समोर आली असून महाराष्ट्रातील लातूर येथील अमोल शिंदे, हरयाणातील नीलम सिंह हिच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे तर एकजण फरार आहे. या घटनेने देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले असून विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आजच्या गंभीर प्रकारानंतर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेतील सर्वच पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली तसेच असे प्रकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकताही अनेक पक्षांच्या नेत्यांनी बोलावून दाखविली.

संसदेवरील हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण होताना…

22 वर्षांपूर्वी, 13 डिसेंबर 2001 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या 5 दहशतवाद्यांनी संसद संकुलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 पोलीस शहीद झाले होते तर एकूण 9 जणांचा मृत्यू झाला होता. 13 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पांढऱया रंगाच्या अॅम्बेसेडरमधील 5 दहशतवादी गेट क्रमांक 12 मधून संसदेत घुसले होते. या हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी अफझल गुरूसह एसएआर गिलानी, अफशान गुरू आणि शौकत हुसैन यांना 15 डिसेंबर 2001 रोजी अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने नंतर गिलानी आणि अफशानची निर्दोष मुक्तता केली. शौकत हुसेनची फाशीची शिक्षा कमी करून 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली, तर अफझल गुरूला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

नेमके काय घडले?

– लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरळीतपणे पार पडला. त्यानंतर झीरो अवर सुरू झाला. त्यात भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार बवेश मुर्मू हे प्रश्न उपस्थित करत असतानाच सभागृहात मोठा आवाज झाला.
-खासदारांनी मागे वळून पाहिले तर दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारल्याने सगळेच हादरले. हे तरुण थेट खासदारांच्या बाकांवर चढून घोषणा देऊ लागले. एका तरुणाने शूजमधून स्मोकबॉम्ब काढून तो पह्डला.
– सभागृहात पिवळय़ा आणि हिरव्या रंगाच्या धुराचे लोळ उठल्याने घबराट पसरली. खासदारांची पळापळ झाली. प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बेफामपणे उडय़ा मारत एक आंदोलक सभापतींच्या आसनाच्या दिशेने जात होता. त्याला काही खासदारांनी घेरून पकडले.
– दोन्ही तरुणांना खासदारांनी पकडले. यावेळी एका तरुणाला चांगलाच चोप देण्यात आला. सभागृहात हल्ला झाला त्याचवेळी बाहेर त्यांच्या साथीदारांनी घोषणाबाजी करत स्मोकबॉम्ब पह्डले.
– खासदार मुकुल नागर यांनी या तरुणांना अडविण्याचे धाडस दाखविले. काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी, सुनील मेंढे व इतर खासदारांनी त्यानंतर या तरुणांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केले.
– धुरामुळे डोळय़ांना त्रास होत होता. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पीठासीन अधिकारी राजेंद्र अगरवाल यांनी कामकाज तहकूब केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

संसदेतही एअरपोर्टसारखे बॉडी स्कॅनर्स

आजच्या या घटनेने सरकार आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. संसदेत आता एअरपोर्टसारखे बॉडी स्कॅनर्स लावले जाणार आहेत. खासदारांच्या खासगी सहाय्यकांना संसदेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनाही संसदेत तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

चौकशीसाठी समिती स्थापन

संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज पेंद्रीय गृह खात्याने दिले आहेत. ‘सीआरपीएफ’चे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी करण्यात येणार आहे. अन्य सुरक्षा यंत्रणेचे प्रमुखही या समितीत असतील. ही समिती घटनेची कारणे शोधून काढतील, तसेच यापुढे काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबतही शिफारस करणार आहे. संसदेतील सुरक्षा सुधारण्याच्या सूचनांसह ही समिती आपला अहवाल लवकरात लवकर सादर करणार आहे.

विधान भवनातील व्हिजिटर्सवर निर्बंध

संसदेतील घटनेनंतर विधान भवनातील व्हिजिटर्सच्या प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. व्हिजिटर्सची संख्या कमी करण्यासाठी प्रत्येक आमदाराला दोन पास दिले जातील, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज घोषित केले.

स्मोकबॉम्ब घेऊन घुसले कसे?

संसद परिसरात नेहमीच सुरक्षा असते. अधिवेशन काळात यात मोठी वाढ केली जाते. संसदेच्या परिसरापासून सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत मेटल डिटेक्टर, स्पॅनिंगसह अनेक तपासण्या होतात. मोबाईल घेऊन जाण्यासही परवानगी नसताना हे तरुण स्मेकबॉम्ब घेऊन घुसले कसे? सुरक्षा यंत्रणा काय करीत होती? असा प्रश्न अवघ्या देशाला पडला आहे. नवीन संसद भवनाची सुरक्षेतील गंभीर त्रुटी समोर आल्यामुळे जगभरात नाचक्की होत आहे.

अमित शहा यांनी राजीनामा द्यावा!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लांबलचक भाषणे ठोकतात, पण त्यांना संसद सुरक्षित ठेवता येत नाही. त्यांनी राजीनामाच द्यायला हवा, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यासह अनेक खासदारांनी केली. या सर्व घडामोडींमुळे नवीन संसद भवनाशी निगडित सुरक्षा व्यवस्था या एका नव्याच मुद्दय़ाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी एक्सवर म्हटले आहे.

हा हल्ला नाही – सभापती

लोकसभेतील दोन घुसखोरांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांना संसदेबाहेर अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी 2 वाजता सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर सांगितले. अमेरिकास्थित खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याने अलीकडेच संसदेवर 13 डिसेंबर वा त्याअगोदर हल्ला करण्याची धमकी दिली होती. आजचा हल्ला त्याच प्रकारचा होता का असे काही सदस्यांनी विचारल्यावर लगेचच प्राथमिक माहितीनुसार तुम्ही जे म्हणताय तसला काही हा प्रकार नव्हता, असा निर्वाळा बिर्ला यांनी दिला.

– पाचवा आरोपी विक्की शर्मा याच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. इतर अटक केलेले चौघे विक्की शर्माचे मित्र आहेत. विक्कीच्या गुरुग्राम सेक्टर 7 मधील घरातच हल्लेखोर थांबले होते.

– सागर हा मूळचा लखनौऊच्या आलमबागचा रहिवासी आहे. सागर रिक्षाचालक असून त्याचे वडील सुतारकाम करतात. गेली 15 वर्षे त्याचे कुटुंब लखनौऊमध्ये राहाते आहे. मनोरंजन हा 2016मध्ये इंजिनीअर झाला असून तो घरची शेती पाहतो. माझ्या मुलाला समाजाच्या भल्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार वाचून त्याला समाजसेवेची प्रेरणा मिळाली असावी, असे त्याचे वडील देवाराज गौडा यांनी सांगितले.

– इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांतून या सर्वांनी संपर्क ठेवून या कटाची नियोजनबद्ध आखणी केली, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

– दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱयांनी घटनास्थळी आढावा घेतला.
– खलिस्तानवादी दहशतवादी गुरपमवंतसिंग पन्नू याने 13 डिसेंबर दरम्यान संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होत़ी तसेच गुप्तचर यंत्रणेनही अलर्ट दिला होता.
– लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या मनोरंजग डी आणि सागर शर्मा या दोघांना जो पास देण्यात आला होता तो केवळ 45 मिनिटांसाठी होता. परंतु, तरीही हे दोघे संसद सभागृहात 2 तास उपस्थित राहिले. संसदेत तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांचे यांच्याकडे लक्ष कसे गेले नाही, असा सवाल आता विचारला जात आहे.
– हल्ल्याची बातमी आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकली. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. असे बीबीसीने म्हटले आहे. हे सुरक्षेतील त्रुटीचे गंभीर प्रकरण आहे, असे ‘गल्फ न्यूज’ आणि ‘ब्लुमबर्ग’ने म्हटले आहे.

सागर शर्मा, मनोरंजन डी. के., अमोल शिंदे, नीलम सिंह, विक्की शर्मा या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य एकजण फरार आहे. हे सर्वच आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते आणि गुरुग्राममध्ये वास्तव्याला होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भाजप खासदाराच्या शिफारशीने पासेस

सागर शर्मा आणि मनोरंजन डी. के. या दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी टाकली. सागर हा लखनौचा आहे तर मनोरंजन हा म्हैसूरचा आहे. या दोघांच्याही व्हिजिटर्स पासची तपासणी केली असता भाजपचे म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या शिफारस पत्राच्या आधारे त्यांना पास दिल्याचे स्पष्ट झाले.