
बुधवारचा दिवस हा संसदेत हजर असलेले खासदार आणि हिंदुस्थानची जनता कधीही विसरू शकत नाही. संसद ही कडेकोट बंदोबस्तात असते या समजाला छेद देणारी घटना बुधवारी घडली. प्रेक्षकगृहातील 2-3 तरुणांनी लोकसभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात उडी मारली. या तरुणांनी बुटात लपवलेल्या धुराच्या नळकांड्या सदनातच फोडल्या. सुदैवाने या धुरामुळे कोणालाही हानी झाली नाही. मात्र हा सगळा प्रकार फक्त संसदेच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला. संसदेत असं काहीतरी होऊ शकतं याची माहिती गुप्तचर यंत्रणांना आणि पोलिसांना मिळालेली होती. तरीही सुरक्षायंत्रणा इतकी ढिली कशी राहिली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणेने पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना अनुचित प्रकार होऊ शकतो, सतर्क राहा अशा सूचना दिल्या होत्या. या घटना होऊच नयेत यासाठी खबरदारी घेण्यासाठी हा इशारा देण्यात आला होता. मात्र इशारा देऊनही ही घटना घडलीच. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या सूचनेनुसार सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती, मात्र दोन तरुण प्रेक्षक गॅलरीत गेले आणि तिथून त्यांनी सभागृहात उड्या मारल्या तर त्यांचे इतर साथीदार संसदेच्या आवारात होते. सभागृहात तरुणांनी उड्या मारल्याचं कळताच बाहेर असलेल्या तरुणांनीही धुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सभागृहात उडी मारणाऱ्या तरुणापैकी एकाने बुटात लपवलेली धुराची नळकांडी फोडली होती. सभागृहात घुसलेल्या दोन्ही तरुणांना खासदारांनी पकडलं आणि चोप देत सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. या गोंधळामुळे काही काळ संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं.
संसद भवनाची सुरक्षा भेदत प्रेक्षक गॅलरीत जाणाऱ्या आणि तिथून सभागृहात उडी मारणाऱ्या तरुणांची नावे सागर आणि मनोरंजन असल्याचे कळते आहे. या दोघांचे साथीदार नीलम आणि अमोल शिंदे हे संसदेच्या परिसरात निदर्शने करत होते. सागर शर्मा मैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारस पत्राच्या आधारे प्रेक्षक गॅलरीपर्यंत पोहोचला होता. सागर हा मूळचा लखनऊच्या आलमबागचा रहिवासी आहे. सागर हा रिक्षाचालक असून त्याचे वडील सुतारकाम करतात. गेली 15 वर्ष सागरचं कुटुंब लखनऊमध्ये राहाते.
अटक करण्यात आलेल्या तरुणांपैकी एक असलेला अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. नीलम सिंह हिचे फेसबुक प्रोफाईल तपासले असता ती वेगवेगळ्या विषयांवर होणाऱ्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेत असल्याचे दिसून आले आहे. नीलम ही हरयाणातील जिंदमधील रहिवासी आहे. नीलम ही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असल्याचे कळाले आहे.
या चौघाचे अन्य दोन साथीदार होते जे फरार झाले आहेत. फरार झालेल्यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पाच आरोपी गुरुग्राममध्ये एकाच ठिकाणी थांबले होते. ललित झा नावाच्या व्यक्तीने तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. या पाच जणांची ओळख पटली असून सहाव्या व्यक्तीची ओळख अद्याप कळू शकलेली नाही. हे सगळेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते. या सगळ्यांनी प्रतिकात्मक निषेध करण्याचे ठरवले होते, मात्र त्यांनी संसदेचे सुरक्षाकडे भेदल्याने सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



























































