पारनेर तालुका सैनिक बँक चौकशीच्या फेऱ्य़ात, विभागीय सहनिबंधकांच्या अहवालाची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार या बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार सैनिक बँकेच्या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी पूर्ण होत आली आहे. यासाठी सहकार विभागाचे पथक बँकेत सुमारे 25 दिवसांपासून तळ ठोकून होते. आता चौकशीत काय निष्पन्न होते, याची उत्सुकता सभासदांना लागली आहे.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे गेली पाच वर्षे विनायक गोस्वामी, बाळासाहेब नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, संपत शिरसाठ व विद्यमान संचालक सुदाम कोथिंबीरे यांनी सहकार विभागाकडे दिले होते. मात्र, सहकार विभाग ठोस निर्णय घेत नव्हते. शेवटी वरील तक्रारदारांना ही फाइल या बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे दिली. हजारे यांनी अभ्यास करून खात्री झाल्यावर सहकार आयुक्तांना लेखी पत्र पाठवून सैनिक बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली.

त्यानुसार सदर तक्रार अर्जाची स्वतंत्र चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी विभागीय सहनिबंधक आर. सी. शाह यांना दिले. शाह यांच्यासह जवळपास दहा अधिकारी व कर्मचाऱयांचे पथक गेल्या 25 दिवसांपासून सैनिक बँकेतील गैरकारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी करीत असून, लवकरच ते सहकार आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार आहेत.

सैनिक बँक ही माजी सैनिकांच्या त्यागातून उभी राहिलेली आहे. मात्र, गेली 10 वर्षे संचालकांनी आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता एकाच्या हाती कारभार सोपवला व नामधारी राहिले. परिणामी बँकेत भ्रष्टाचाराचा शिरकाव झाला. आता सहकार विभागाच्या चौकशीतून बँकेत केलेला गैरव्यवहार, भ्रष्टाचार बाहेर येईल व त्यात दोषी असणाऱयांवर कडक कारवाई झाली पाहिजे. -विनायक गोस्वामी, सभासद, सैनिक बँक.