पारनेरमध्ये तब्बल सहा हजार किलो बनावट वाटाणा बियाणे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाटाण्याचे बनावट बियाणे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने पारनेर येथे छापा टाकून तब्बल सहा हजार किलो निकृष्ट बियाणे जप्त केले. या कारवाईत 40 किलोंची एक याप्रमाणे 150 पोती जप्त करण्यात आली आहेत. या बियाणाची एकूण किंमत 6 लाख रुपये आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण गुलाबराव मांगडे (वय 45, रा. श्रीगोंदा, जि. नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निकृष्ट बियाणांची विक्री आणि साठवण करणाऱयांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग आणि पोलिसांच्या पथकाने सापळा रचून पारनेरमध्ये वाटाण्याच्या निकृष्ट बियाणांचा ट्रक जप्त केला.

पारनेरमधील आंबेडकर चौकात ही कारवाई करण्यात आली. ट्रकमध्ये पटेल सीड्स कार्पोरेशन ‘जालौन यूपी’ या कंपनीचे 6 टन वाटाण्याचे बियाणे होते. या बियाणांची एकूण किंमत 6 लाख रुपये आहे. याप्रकरणी ट्रकचालक (नाव माहीत नाही) आणि पटेल सीड्स कार्पोरेशन जालीन यूपी या कंपनीच्या मालकावर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बियाणेनिर्मिती कंपनीकडे राज्याच्या कृषी संचालनालयाचा बियाणे विक्रीचा परवाना नसल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली.

कृषी अधिकारी वाळीबा नाथू उपडे, तालुका कृषी अधिकारी विलास रावजी गायकवाड, जयंत किसनाराव साळवे, किरण गणपत पिसाळ यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली.

व्यापाऱयाचा शोध सुरू

खरीप हंगामात तालुक्यात पठार भागात हिरव्या वाटाण्याचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे वाटाण्याच्या बियाण्याला मागणी असते. बियाण्याची मोठी मागणी लक्षात घेऊन पारनेर शहर अथवा तालुक्यात बनावट बियाणे मागवणारा व्यापारी कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोटारचालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे पारनेर पोलिसांनी ‘त्या’व्यापाऱयाचा शोध सुरू आहे.