
सामना प्रतिनिधी, ठाणे
हिंदुस्थानचा ध्वज…उजळणारे दीप…संदेश…परंपरा…देवदेवतांच्या प्रतिमा पारसिक डोंगरावर ’लेझर शो’ने झळकणार आहेत. विस्तीर्ण डोंगर या आकर्षक विद्युत रोषणाईने अधिकच लखलखणार असून येथील मुंब्रादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या भव्य कातळावर सण व परंपरांचे दर्शन होणार आहे. हिंदुस्थानातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार असून पारसिक चौपाटीच्या साक्षीने उभ्या असणाऱया या डोंगराला त्यामुळे झळाळी येणार आहे.
मुंब्रा येथील पारसिक रेतिबंदरसमोर आंतरराष्ट्रीय कीर्तीची चौपाटी बनवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. भविष्यात या चौपाटीला भेट देण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येणार असून त्यांना आकर्षित करण्यासाठी ठाणे पालिकेने पारसिक डोंगर उजळवण्याची तयारी केली आहे. पारसिक चौपाटीवरून या डोंगराचे मनोहरी रूप सायंकाळच्या आणि रात्रीच्या वेळी पर्यटकांना अनुभवता येणार असून लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. त्यानुसार आज पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज पारसिक डोंगराची पाहणी केली.
पारसिक डोंगराचे सौंदर्य खुलणार
मुंब्रा बायपास, मध्य रेल्वे, पारसिक चौपाटी, मुंब्रा शहराच्या अनेक भागांतून पारसिक डोंगराचे दर्शन होते. सध्या या डोंगरावर मुंब्रा देवीचे टुमदार मंदिर आहे. नवरात्रोत्सवादरम्यान या मंदिराच्या रोषणाईने डोंगर उजळून दिसतो. मात्र आता वर्षभर विविध रंगी लेझर आणि लाईट्समुळे पारसिक डोंगराचे सौंदर्य खुलून दिसणार आहे.




























































