
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या संदर्भातील विषय दोन दिवसांत निवळेल, अशी माहिती पवार कुटुंबीयांमधील निकटवर्तीयांनी प्रसिध्दी माध्यमांना दिल्याचे वृत्त आहे. मागील दोन दिवसांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीय आज एकत्र आले होते. या बैठकीनंतर पार्थ पवार यांची नाराजी दूर होईल होईल असेही सांगण्यात आले.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याबाबत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना गुरुवारी प्रश्न विचारला होता. त्यावर पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. माझ्या नातवाच्या बोलण्याला काडीची किंमत देत नाही असे शरद पवार म्हणाले होते. त्याच रात्री अजित पवार, जयंत पाटील यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. बारामतीजवळील कन्हेरीमधील सहयोग सोसायटीमधील श्रीनिवास पवार यांच्या घरी पवार कुटुंबीय भेटले. या बैठकीला पार्थ पवार तसेच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार, सुनेत्रा पवार, स्वतः श्रीनिवास पवार व शर्मिला पवार उपस्थित होत्या. पण अजित पवार स्वतः या बैठकीला उपस्थित नव्हते असे समजते. या बैठकीतील विचारविनिमयातून सर्व काही ठीक होईल. पार्थची नाराजी दूर होईल असा विश्वास यावेळी पवार कुटुंबातील एका सदस्याने पत्रकारांशी अनौपचारिकरणे बोलताना व्यक्त केला.




























































