
सामना प्रतिनिधी । पुणे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आश्वासनांची खिरापत वाटणे उमेदवार तसेच पक्षालाही महागात पडणार आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या नवीन नियमानुसार प्रचारामध्ये दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण केली याचा अहवाल संबंधित पक्षाला दरवर्षी द्यावा लागणार आहे. जर पाच वर्षांत जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने संबंधित पक्षाने पूर्ण केली नाहीत तर त्या पक्षाची नोंदणी रद्द करण्याची कारवाईही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. यापुढे होणाऱया प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी हा निर्णय लागू आहे.
राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित ‘लोकशाही, निकडणूक क सुशासन’ या कार्यशाळेनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी राजकीय पक्षांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यावेळी उपस्थित होते. सहारिया म्हणाले, यापुढील काळात केवळ उमेदवारांनाच नाही तर राजकीय पक्षांनासुद्धा निवडणुकीनंतर सहा महिन्यांत निवडणूक खर्चाचा तपशील आयोगाकडे सादर करण्याचे बंधन घातले आहे. खर्चाचा तपशील सादर न करणाऱया पक्षाची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. तरुणांमध्ये निवडणुकीविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यापीठांचे सहकार्य घेतले जात आहे. चांगल्या उमेदवारांची माहिती मतदारांना समजावी यासाठी मतदानापूर्वी उमेदवारांच्या माहितीचे फलक शहराच्या मध्य वस्तीत तीन ते चार दिवस लावले जावेत अशाही सूचना उमेदवारांना केल्या आहेत, असेही सहारिया यांनी स्पष्ट केले.
– राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांसाठी विशिष्ट निवडणूक चिन्ह हवे असल्यास राष्ट्रीय पक्षांसह सर्वच पक्षांना स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा लागणार आहे असे नमूद करून सहारिया म्हणाले, प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीचा अर्ज भरताना मालमत्तेचा व स्वत:वर असणाऱया गुन्ह्यांचा तपशील द्यावा लागतो, परंतु आता केवळ मालमत्तेचा तपशीलच नाही तर संबंधित स्थावर व जंगम मालमत्तेचा स्रोत कोणता आहे याबाबतची माहितीसुद्धा द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राटाचा तपशीलही द्यावा लागेल असे बंधन राज्य निवडणूक आयोगाने घातले आहे.


























































