।। जो जे वांछिल तो ते लाहो।। प्राणिजात!

3264

डॉ. अनिल सहस्रबुद्धे

माऊलींचे पसायदान…छोटय़ाशा ज्ञानियाने साऱया विश्वाचे आर्त समजून घेऊन साऱयांसाठी हे पसायदान मागितले आहे… अनेक शतकांनंतरही ज्ञानीयाचा शब्द न शब्द आजच्या वर्तमानाशी तंतोतंत सुसंगत आहे. जे आर्ट लिव्हिंगच्या माध्यमातून जगण्याचा शोध घेत आहेत त्यांनी केवळ पसायदान रोज वाचावे…

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या घोषाने टाळ मृदुंगाच्या निनादानं महाराष्ट्राच्या अवघ्या वाटा पंढरीच्या वाटेने वाहत्या झाल्या आहेत. कानाकोपऱयातला माणूस पंढरीच्या दिशेने वाट चालू लागतो तो देश म्हणजे महाराष्ट्र अशी मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी महाराष्ट्राची व्याख्याच केली आहे. अवघे विश्वच महाराष्ट्र व्हावे असे माऊलींचे  मागणे. माऊलींनी भूतमात्रांच्या ठिकाणी असलेल्या विश्वात्म्याला, विश्वशांतीची आस मनात ठेवून विश्वशांती मंत्र ‘पसायदान’ गाऊन आवाहन केले. पसायदान हा मंत्र तर वारी हा त्या मंत्रसिद्धतेचा विधी आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘विठ्ठल विठ्ठल’ हा त्या वाग्यज्ञविधीतील स्वःकार होय. माऊलींनी या सिद्धीतील अपेक्षा भूतमात्रांच्या मनात सगुणरूपात  स्फुरलेल्या विश्वात्मक परमात्म्यापुढे मांडली –

जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।

भूतां परस्परे पडो। मैत्र जीवाचे ।। ज्ञा.१८.१७९४।।

दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्यें पाहो।

जो जे वांच्छिल तो तें लाहो। प्राणिजात ।।९५।।

माऊलींनी व्यक्त केलेल्या अशा सर्व अपेक्षा वारीत ‘हाताने टाळी, मुखाने नाम’ असा गजर करीत, वाट मळत चाललेल्या वारकऱयांच्या मनामनात सिद्धीस जातात. साक्षात ‘प्रेम’ अढळपणे आकारलेला तो विठ्ठल. ‘घेता नाम विठोबाचे, जळती डोंगर पापांचे.’ माणूस पापाने अशांत होतो तर पुण्याने शांत होतो. पुण्य म्हणजे सर्वांभूती प्रेम. यासाठीच तर माऊलीची ‘भूता परस्परें पडो। मैत्र जीवांचे।।’ ही आर्त हाक. विष्णूमय जग। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम। अमंगळ।। कोणाही जीवाचा। न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर। पूजनाचे।। हा वैष्णव धर्म जागविण्यासाठी हजारो वर्षांची वारीची परंपरा. प्रेमरूपा भक्ती मनात जागली तर माणूसच विष्णू होतो. अर्थात परमेश्वर होतो.

‘पसायदान’ मंत्र हा कोणा एका संप्रदायाची मिराशी नाही. माऊलींनी विश्वात्मक, परमात्म्याकडे मागणे मागितले आहे. हे मागणे विश्वातील मनुष्यामात्रांसाठीच नव्हे तर भूतमात्रांसाठी आहे. माणसाचं मन विश्वात्मक व्हावं ही या मंत्राची सिद्धता आहे. पण जातपात, धर्म, गाव, प्रदेश, देश आदी सर्व भेद मनातून जावेत म्हणून ही विश्वात्मक परमात्म्याची वारी. असे सर्वांभूती प्रेम निर्माण करण्याचा अभ्यास म्हणजे माणसातील माणूसपण जागवणे होय. हे माणूसपण जागले की, ‘खळत्व’ सांडते. स्वार्थपरता, स्पर्धा, असूया, अतृप्तता आणि त्यापायी मनात दाटणारी दुरिते नाहीशी झाली की, आत्मस्वरूपाचे ज्ञान होते. आपणच विश्वरूप आहोत, हे अवगत होते. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ यासाठी प्रत्येकजण झटू लागतो. विश्वकल्याण, सत चिद् आनंद-भाव प्रकटतो. दृष्ट अदृष्ट अशा सर्व भूतमात्रांचे परस्पर प्रेममय नाते तेवढे राहते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ सर्व भूतमात्रांचे परस्पर प्रेममय नाते तेवढे राहते. ‘वसुधैव कुटुंबकम’चा साक्षात्कार होतो. हाच ‘मनपावन’योग. माऊली ‘योगी पावन मनाचा’ आहेत. तसे प्रत्येकाला होता येते. त्यासाठी वारी सिद्ध केली पाहिजे.

सर्वांभूती प्रेमस्वरूपा भक्तीचे जागरण करणे अर्थात मानव्याचे पालन करणे होय. असा आचार धर्म घराघरात, प्रवासात, व्यवहारात, जनात आणि विजनात जागवता येतो. त्याच्यासाठी स्वतःबरोबरच ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’, अशा व्यवहाराची मनाला सवय लावून वर्तनाचा अभ्यास करावा. एवढी माफक अपेक्षा माऊलींनी ‘पसायदान’ मंत्रातून प्रकटविली आहे. मनाची ताटी उघडली की चिंता आणि क्रोध नाहीसे होतातच. दूरितांचा तिमीर नाहीसा होतो. उरतो फक्त पावन मनाचा माणूस. प्रकटतो मैत्रभाव, प्रेमाचा प्रकाश, निस्वार्थप्रेम. वारीची सिद्धता घडते. वारी म्हणजे तीच तीच गोष्ट वारंवार अगदी स्वभाव होईपर्यंत करणे होय. आपल्यातच आत्मस्वरूप रूपातील विश्वात्मक परमेश्वराकडे हे पसायदान मागून मनपावन योगाची वारी करायची आहे. त्यात माणसानेच निर्माण केलेले भेदाभेद आपसूकच वारले जातील. याचा स्पष्ट अर्थ असा की, ‘मन करा रे प्रसन्न। सर्वसिद्धींचे कारण।। पसायदानाचा मनात जागर हीच वारीची सिद्धी होय. हा अभ्यास दृढ भक्तीने म्हणजे ‘विठ्ठल विठ्ठल’ भावाने करायचा.

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ।।

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ।।

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ।।

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ।।

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरखी । अखंडित ।।

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें बरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।

आपली प्रतिक्रिया द्या