‘वंदे भारत’ एक्प्रेसची दिवाळी, मध्य रेल्वेच्या तिजोरीत कोटय़वधींचा महसूल

दिवाळीच्या सुट्टीदरम्यान बाहेरगावी फिरायला जाताना प्रवाशांनी वंदे भारत एक्प्रेसला पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांत मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधून तब्बल 68 हजार 736 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचा महसूल मध्य रेल्वेच्या ताफ्यात जमा झाला आहे.

सध्या मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-मडगाव, नागपूर- बिलासपूर आणि नागपूर-इंदूर वंदे भारत एक्प्रेसला प्रवाशांची पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे दिवाळीत या पाचही एक्प्रेसला प्रवाशांनी पसंती दिली. 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत तब्बल 68 हजार 736 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मध्य रेल्वेला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सर्वाधिक पसंती मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्प्रेसला मिळाली आहे. या कालावधीत मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्प्रेसमधून 13 हजार 340 प्रवाशांनी तर मुंबई-साईनगर शिर्डी एक्प्रेसमधून 11 हजार 189 प्रवाशांनी प्रवास केला आहे.