
मध्य रेल्वेने आता प्रवाशांचा खिसा कापण्यासाठी नवा फंडा अवलंबला आहे. एसी लोकल स्थानकातून निघून जात असतानाही फलाटावरील इंडिकेटरवर सदर गाडी पुढील पाच-दहा मिनिटांत येणार असल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे प्रवासी एसी लोकलने प्रवास करण्यासाठी महागडे तिकीट काढून धावतपळत फलाटावर येतात. मात्र फलाटावर भलतीच गाडी येत असल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव एसीचे तिकीट असतानाही साध्या लोकलने दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
उपनगरीय मार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांना आरामात प्रवास करता यावा म्हणून सहा एसी लोकलच्या माध्यमातून तब्बल 66 फेऱया चालवल्या जातात. सदर गाडीचे तिकीट फर्स्ट क्लास डब्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला ते परवडत नाही. मात्र साध्या लोकल गाडय़ांना मोठी गर्दी असल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असलेली कुटुंबे खिशाला परवडत नसतानाही गैरसोय टाळण्यासाठी एसी लोकलने प्रवास करतात. परंतु सदर एसी लोकलची वेळ रामभरोसे आहे. अनेकदा गाडी निघून गेल्यानंतरही येणार असल्याचे इंडिकेटरवर दाखवले जाते. सदरचा प्रकार कुर्ला, घाटकोरसह अन्य स्थानकांवरही घडत आहे. त्यामुळे प्रवासी तिकीट काढून फलाटावर येताता तेव्हा साधी लोकल आल्याने त्यांचा मोठा भ्रमनिरास होत असल्याने त्यांच्याकडून रेल्वेच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
एसी लोकलला सर्वसामान्य प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे एसी गाडीची जास्तीत जास्त तिकिटे खपवण्याचा गोरखधंदा रेल्वेने सुरू केल्याचे दिसत आहे. गाडी स्थानकातून गेलेली असतानाही ती येणार असल्याचे दाखवणे हे म्हणजे प्रवाशांच्या खिशावर एकप्रकारे डल्लाचा मारण्याचा प्रकार आहे.


























































