
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
एकीकडे लोक महागाईने त्रासलेले असतानाच 4 रुपयांनी स्वस्त असलेले पतंजली टोंड मिल्क बाजारात आणण्याची घोषणा योगगुरू बाबा रामदेव यांनी सोमवारी केली. विशेष म्हणजे हे दूध सहा महिने खराब होणार नाही, असा दावा बाबांनी केला आहे. एकीकडे अमूल आणि मदर डेअरी यांचे दही 45 रुपये किलो भावाने मिळते. मात्र पतंजली दही केवळ 40 रुपये किलो भावाने मिळणार आहे. बाबा रामदेव यांनी आपली ही पत्रकार परिषद एका गोठय़ात घेतली. तेथे त्यांच्या शेकडो गायी, म्हशी होत्या. ते म्हणाले की, आपले स्वस्त टोंड दूध सध्या तरी नवी दिल्ली, हरिद्वार, जयपूर आणि महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदाबाद व नगर येथील बाजारांमध्ये उपलब्ध असले तरी त्यानंतर लवकरच ते देशभर वितरीत केले जाणार आहे.























































