रोडरोमिओंविरोधात पाथर्डी पोलीस उतरले रस्त्यावर

पाथर्डी विद्यालय परिसरात फिरणाऱया रोडरोमिओंच्या विरोधात आज पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत अनेकांना पोलिसी हिसका दाखविल्याने मुलींची छेडछाड काढणाऱयांचे धाबे दणाणले आहे. पोलीस प्रशासनाने केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

शहरात अनेक विद्यालये व महाविद्यालये असून, त्यांच्या गेटवर थांबून मुलींची छेडछाड करण्याचे ‘उद्योग’ अनेक तरुण करतात. बदनामी नको म्हणून अनेकजण पोलिसांकडे धाव घेत नसल्याने या तरुणांचे मनोबल उंचावले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे पोलीस ठाण्यामधील सर्वच अधिकारी व कर्मचाऱयांना घेऊन आज रस्त्यावर उतरले. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी चव्हाण यांनी बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘तुमची कोणी छेड काढत असेल, तर आमच्याशी संपर्क करा. तुमचे नाव गोपनीय ठेवून छेड काढणाऱया तरुणांचा आम्ही बंदोबस्त करू,’ अशी ग्वाही दिली.

त्यानंतर चव्हाण यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, श्रीकांत डांगे, कौशल्यराम वाघ हे सर्व पोलीस कर्मचारी घेऊन विद्यालयाकडे जाणाऱया रस्त्यावर थांबले. त्यांनी नंबर नसलेले दुचाकीस्वार, दुचाकी चालविणाऱया अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्याला आणले. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली. ही मोहीम आणखी काही दिवस राबविणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.