नगर जिल्ह्यात राजकीय वादातून सरपंचाची गोळ्या घालून हत्या, तीन आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील निंबेदैत्य नांदूर गावात राजकीय वादातून दोन गटात झालेल्या गोळीबारामध्ये सरपंचाचा मृत्यू झाला आहे. या गोळीबार व हत्येच्या गुन्ह्यामधील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत जेरबंद केले आहे. ज्ञानेश्‍वर विष्णू दहाफळे (28), राहुल शहादेव दहिफळे (22), भागत हरीभाऊ नागरगोजे (50) अशी आरोपींची नावे आहेत.

गोळीबाराच्या घटनेतील गंभीर जखमी सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शाहदेव उर्फ पम्प्या पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये या पूर्वी तीन ते चार वेळा वाद सुद्धा झालेले होते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातीलच स्व. गोपीनाथ मुंडे चौकात दोन्ही गटात मारामारी झाली. यात शाहदेव दहिफळे यांनी आपल्याजवळ असलेल्या रिव्हॉलरमधून संजय दहिफळे यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. यावेळी झालेल्या मारामारीत संजय दहिफळे यांच्या गटाचे ज्ञानेश्वर दहिफळे यांच्या डोक्याला जबर मार लागला तर भीमराज दहिफळे व सदाशिव दहिफळे यांना किरकोळ मार लागला.

या प्रकरणी गणेश दहीफळे (30) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी येथे कलम 302, 307, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 सह हत्यार कायदा कलम 3, 25, 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी 24 तासात आरोपींना जेरबंद केले आहे.