सिंधुदुर्गनगरीत खड्डे की खड्ड्यात सिंधुदुर्गनगरी! रस्त्यांच्या दुरावस्थेकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

324

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी मधील रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे दिसत नसल्याने या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सिंधुदुर्गनगरीतील आकाशवाणी केंद्र, डॉन बॉस्को स्कुल सर्कल, गरुड़ सर्कल, कलेक्टर कॉलनी, जिप कॉलनी आदि ठिकाणच्या मार्गावर खड़े पडले आहेत. एकंदरित सिंधुदुर्गनगरी खड्डेमय बनली असून सिंधुदुर्गनगरीत खड्डे आहेत की खड्ड्यात सिंधुदुर्गनगरी असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासन केंव्हा लक्ष देणार असा प्रश्न  वाहनचालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आहे. या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांची अक्षरश: चाळन झाली आहे. जिल्हा मुख्यल्याचे प्रवेशद्वार असलेल्या ओरोस फाटा येतून सुरु झालेले खड्डे पूर्ण सिंधुदुर्गनगरी मध्ये पाहायला मिळत आहेत. यात ओरोस फाटा ते डॉन बॉस्को सर्कल परिसर, आकाशवाणी केंद्रासमोरील रस्ता, कलेक्टरकॉलनी रस्ता, जिप कॉलनी रस्ता, गरुड सर्कल रस्ता आणि प्राधिकरण मधील अंतर्गत रस्त्यांच्या समावेश आहे. या रस्त्यांवर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की या रस्त्यांवरून वाहन चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. खड्डयांचे प्रमाण एवढे मोठे आहे की या रस्त्यावरून नागरिकांना चालने ही अवघड होत आहे. पाऊस पडत असल्यास या खड्डयांमध्ये पाणी भरल्यावर हे खड्डे दिसत नाहीत. वाहनाचे अपघात होतात. पादचारी खड्ड्यात जावून त्यांचे कपड़े ख़राब होत असल्याने सिंधुदुर्गनगरी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांनी मे महिन्यात लावून धरली होती. मात्र लोकसभेची निवडणूक आचारसंहिता असल्याने आचारसंहिता संपताच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता ऑगस्ट महीना सुरु झाला तरी या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने सिंधुदुर्गनगरी मधील रस्ते खड्डेमय बनले असून या खड्डेमय रस्त्यांमुळे सिंधुदुर्गनगरीत खड्डे की खड्यात सिंधुदुर्गनगरी असे चित्र निर्माण झाले आहे.

ऑगस्ट महीना सुरु झाला तरी या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने रस्त्यातूनच वाहन चालक आणि नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासन केंव्हा लक्ष देणार असा प्रश्न वाहनचालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.

रस्त्यांना गटारेही नाहीत

सिंधुदुर्गनगरीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा रुग्णालय आदी शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी अनेक नागरिक आपल्या विविध कामांसाठी येत असतात मात्र रस्त्यांमधील खड्यांमधून एखादे वाहन गेल्यास रस्त्यांवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना आंघोळच करावी लागते. शिवाय सिंधुदुर्गनगरीत येणाऱ्या रस्त्यांना गटारे नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून जाते. परिणामी रस्त्यावर शेवाळ साचुन माणसे पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही वेळा तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील पाण्याचा फटका बसतो. पाण्यात भिजल्याने ते नागरिक कार्यालयात जावू शकत नाहीत. त्यांना कामाच्या पुर्ततेअभावी रिकामी परत फिरावे लागते. उलट त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीमधील रस्त्यांवरील पाण्याचा नीचरा होण्यासाठी गटारे बांधण्यात यावीत अशी मागणीही  येथील नागरिकांकडून केली जात आहे.

२५ कोटी कधी खर्च होणार?

सिंधुदुर्गनगरीच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली असून येथील काही समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला  २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील काही रक्कम जिल्हा प्रशासनाकडे प्राप्तही झाली आहे. मात्र त्यातून या रस्त्यांची दुरुस्ती का केली जात नाही असा प्रश्नही येथील नागरिकांकड़ून विचारला जात आहे.

प्राधिकरणकडील कोट्यावधीच्या निधी उपयोग काय?

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण अंतर्गत येणारे सर्व रस्ते नादुरुस्त झाले आहेत. मात्र त्यांची डागदुजी केली जात नाही. शिवाय सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणकडे कोट्यावधीचा निधी उपलब्ध आहे. तसे जिल्हाधिकाऱ्यांकडूनही सांगण्यात येते. मात्र हा निधी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खर्च केला जात नाही त्यामुळे प्राधिकरणकडे असलेल्या कोट्यावधीच्या निधीचा उपयोग काय असा प्रश्नही येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या