मोदींचे विमान जमिनीवर आले- खासदार राजू शेट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पाथर्डी

साडेचार वर्ष हवेत उडणारे नरेंद्र मोदींचे विमान तीन राज्यातील निवडणुकीच्या निकालाने आता जमिनीवर आले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कमळाची पाकळी सुद्धा फुलणार नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा राजू शेट्टी यांनी केली.

तालूक्यातील खोजेवाडी ( निवडूंगे ) येथे स्वाभिमानीचे तालूका अध्यक्ष शरद मरकड यांनी लोकसहभागातून सुरु केलेल्या राज्यातल्या पहिल्या जनावरांच्या छावणीला राजू शेट्टी यांनी आज भेट दिली. या वेळी शेट्टी यांनी छावणीतील जनावरांसाठी पाच टन चारा देत उपस्थित शेतकऱ्यांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वाभिमानीचे जेष्ठनेते दशरथ सावंत , जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे , रवी मोरे , दत्ता फुंदे , संतोष गायकवाड , हंसराज वडगुले , संतोष आहेर , डॉ कृषीराज टकले , संदीप राजळे , भानूदास गर्जे , माऊली वराडे , वसंत मरकड , सत्यवान बबन बर्डे , राजेंद्र बर्डे , नानासाहेब भगत, बाबासाहेब बुधवंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि सध्याचे सत्ताधारी एकीकडे मस्तवाल झाले आहे तर दुसरीकडे त्यांना वठणीवर आणण्यात दोन्ही काँग्रेस चे नेते कमी पडले आहेत. देशातील मोदी सरकारचे सीबीआय व ईडी या दोन्ही संस्था हस्तक असून या हस्तकाचा वापर करत विरोधकांना घायाळ करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. या सरकारला सत्तेची मस्ती चढली असून ही मस्ती येणाऱ्या निवडणुकीत आता उतरावी लागणार आहे. मागील निवडणूकीत भरघोस आश्वासने देत भाजपा सत्तेवर आली मात्र त्यांनीच दिलेली आश्वासने त्यांनीच पायदळी तुडवण्याचे काम केले आहे. येथून पुढील काळात होणाऱ्या निवडणूकांमध्ये जाहीरणाम्यात दिलेली आश्वासन न पाळणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द होणार असल्याने खोट बोलणाऱ्यां भाजप सरकारला आता घरी बसावे लागणार आहे. असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

या सरकारला शेतकऱ्यांचे काहीही देणे घेणे नसून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यांनी दुष्काळ जाहीर केला. मात्र अडीच महिने झाले उपाययोजना कोणत्याही केल्या नाहीत. दुष्काळात जनावरे कशी जगवायची याची शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली असली तरीही शेतकऱ्यांची जनावरे जगवावीत असे सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. स्वाभिमानीचा तालुकाध्यक्ष शरद मरकड याने पुढाकार घेत जनावरांसाठी छावणी सुरु केली ही बाब खरोखर भूषणावह असून या छावणीला सरकारने मदत करो अथवा न करो आणखी सहा ते सात महिने आपण या छावणीला मदत करणार असल्याचे ते शेवटी म्हणाले.