वाडा तालुक्यातील संतापजनक घटना

748

108 क्रमांकाची रुग्णवाहिका न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

108 क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना वाडा तालुक्यातील डाहे गावात घडली. रमेश गवळी (46) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गवळी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रमेश गवळी हे आपल्या शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने त्यांना रविवारी सायंकाळी 5 वाजता तातडीने वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी गवळी यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु सर्पाच्या विषाचा प्रभाव जास्त असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यासाठी व्हेण्टीलेटरची सुविधा असलेल्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची आवश्यकता होती.

रमेश गवळी यांचा मुलगा अनंता याने 108 क्रमांकावर दोन ते तीन वेळा पह्न केला, पण 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रयत्न करूनही अन्य रुग्णवाहिकाही उपलब्ध न झाल्याने अखेर रात्री साडेआठ वाजता गवळी यांचा मृत्यू झाला. वेळेवर 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळाली नसल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रमेश गवळी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान 108 या क्रमांकावर संपर्प साधला असता जवळपासच्या सहा ते सात रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या