दोकाडियाच्या घरात उंदीर मारायचे औषध सापडले, पण ते आयुर्वेदिक निघाले; पायधुनी मृत्युकांड गूढ अजूनही कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पायधुनी येथील दोकाडिया कुटुंबीयांच्या विसेरा अहवालात उंदीर मारायचे औषध सापडल्याने चौघांचाही मृत्यू विषामुळेच झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दोकाडिया यांच्या घरात उंदीर मारायचे औषध देखील मिळून आले आहे. परंतु ते औषध आयुर्वेदिक असल्याने त्याचाच वापर झाला की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच झिंक फॉस्फाईड हे औषध दोकाडिया यांच्या घरी आणले कसे आणि कोणी, ते कलिंगडमध्ये कोणी टाकले याचा तपास लागू शकलेला नाही.

26 एप्रिल रोजी पायधुनीत राहणाऱया अब्दुल्ला दोकाडिया (44), त्याची पत्नी नसरिन दोकाडिया (35), दोन मुली आयेशा (16) आणि झैनब (12) यांचा उलटय़ा आणि जुलाबचा त्रास होऊन एकामागोमाग जे जे इस्पितळात मृत्यू झाला होता. कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन चौघांचा असा मृत्यू झाल्याचे तेव्हा बोलले जात होते. त्यामुळे न्यायवैद्यक शास्त्र विभाग, एफडीएचा अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर गुरुवारी न्यायवैद्यक शास्त्र विभागाकडून चौघांचाही विसेराचा अहवाल आला आणि त्यानुसार चौघांच्या ही शरीरात झिंक फॉस्फाईड नावाचे उंदीर मारायचे औषध आढळून आले. त्यामुळे चौघांवर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, दोकाडियाच्या घरात उंदीर मारायचे औषध मिळाले आहे. पण ते आयुर्वेदिक असल्याने त्यात झिंक फॉस्फाईडचा अंश नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे ते औषध कलिंगडमध्ये कोणी टाकले हे अस्पष्ट असून हे हत्या करून आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे.

मग झिंक फॉस्फाईड आले कसे?

कलिंगड आणि चौघांच्याही शरीरात झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारायचे औषध सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता हे औषध कलिंगड आणि चौघांच्या शरीरात गेले कसे याचे गूढ अद्याप कायम आहे. परिमंडळ-1 मधील सर्व पोलीस ठाण्यांतील प्रकटीकरण पथके तसेच गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा वेगवेगळ्या पैलूने तपास करीत आहेत.