धर्मशाळेतील ‘तो’ सामना आयपीएलमधून डिलीट

गेल्या 8 मे रोजी दिल्ली आणि पंजाब यांच्यात धर्मशाळा येथे खेळला गेलेला सामना 10.1 षटकानंतर थांबवण्यात आला होता. तेव्हा पंजाबने 1 बाद 122 धावा ठोकल्या होत्या. प्रभसिमरन सिंहने नाबाद 50 तर प्रियांश आर्यने 70 धावा ठोकल्या होत्या.  त्यानंतर तो सामना रद्द करण्यात आला. मग आठ दिवसांसाठी आयपीएललाही ब्रेक देण्यात आले. धर्मशाळेतील तो सामना रद्द करण्यात आला असला तरी आयपीएलच्या आकडेवारीत  त्या 122 धावांची नोंद होती. पण आता आयपीएलच्या आकडेवारीतून त्या सामन्याचे सर्व आकडे डिलीट करण्यात आलेले आहेत. त्या सामन्यात केलेली दोन अर्धशतकेही काढून टाकण्यात आल्याने आकडेवारीत काहीसा गोंधळ झाला होता. पण आयपीएल तो अर्धवट सामना पुन्हा नव्याने खेळविणार असल्यामुळे 8 मेचे सर्व आकडे आयपीएलमधून कायमस्वरूपी कमी करण्यात आले आहेत.

आयपीएलने त्या 122 धावा कमी केल्यामुळे प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांच्या नावावर असलेली अर्धशतके आणि त्या धावाही त्यांच्या एपूण धावांमधून कमी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. आधी प्रभसिमरनच्या नावावर 487 धावा होत्या. त्या आता 437 करण्यात आल्या आहेत.

तिवारी पुन्हा पदार्पण करणार

धर्मशाळेत माधव तिवारीने दिल्लीसाठी पदार्पण केले होते. आता तो सामना रद्दच केल्यामुळे माधवला पुन्हा एकदा पदार्पण करावे लागणार आहे.