धोनीचे कौतुक, सकलेनला फटके; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आगपाखड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रिंसह धोनी निवृत्त झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर त्याचे कौतुक केले. सकलेन मुश्ताकने केलेल्या स्तुतीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) चांगलीच आगपाखड झाली. पीसीबीकडून त्याला सुनावण्यात आले की, तू बोर्डाचा कर्मचारी आहेस. त्यामुळे यूट्यूब चॅनेल चालवू शकत नाहीस.

सकलेन मुश्ताक याने यूट्यूबवर महेंद्रिंसह धोनीबाबत म्हटले की, धोनी महान क्रिकेटपटू असून तो खेळाचा सच्चा राजदूत आहे. धोनीसारख्या दिग्गज खेळाडूचा अंतिम सामना मैदानात व्हायला हवा होता, बीसीसीआयकडून चांगली वागणूक देण्यात आलेली नाही. यावर पीसीबीने सकलेन मुश्ताकला धारेवर धरले. सकलेन मुश्ताक पीसीबीच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय प्लेअर डेव्हलपमेण्ट विंगचा प्रमुख आहे.  

सर्व प्रशिक्षकांना तंबी

सकलेन मुश्ताकसह बासीत अली, फैसल इक्बाल, मोहम्मद वासीम, अब्दुल रझ्झाक हे पाकिस्तानचे माजी खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय आहेत. या सर्वांनाच पीसीबीकडून तंबी देण्यात आली आहे. पीसीबीशी करारबद्ध झाल्यानंतर नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

मीडियाशी संवाद साधण्यावरही बंदी

पीसीबीने प्रशिक्षकांना मीडियाशी संवाद साधण्यावरही बंदी लावण्यात आली आहे. कोणत्याही मीडियाशी संवाद साधण्याआधी करारबद्ध व्यक्तीला पीसीबीची परवानगी घ्यावी लागणार आहे असे पीसीबीकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच याआधी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनाही हिंदुस्थानी क्रिकेटपटूंबाबत कमेंट करण्यावर बंदी लादण्यात आली होती.