पेणच्या मुर्तिकारांनी मागितली जावडेकरांकडे दाद; पीओपी मूर्तीबंदी पुढे ढकलण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आगामी गणेशोत्सवासाठी पीओपीच्या मूर्तीवर घातलेली बंदी आणि इतर अनेक निर्बंधामुळे मुंबईसह राज्यातील अनेक मुर्तिकारांना फटका बसण्याची शक्यता आहे. पेण येथील मुर्तिकारांनाही या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता असून या निर्णयामुळे पेण येथील मुर्तिकार रस्त्यावर येण्याची भीती वर्तविली आहे. त्यामुळे पेण येथील श्री गणेश मुर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळाने याप्रश्नी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे दाद मागितली असून या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून करावी, अशी मागणी केली आहे.

उत्सव कालावधीनंतर होणारे प्रदूषण लक्षात घेता गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरु असलेली याचिका नुकतीच निकाली काढण्यात आली. या याचिकेच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळातर्फे उत्सव कालावधीसाठी तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींची निर्मिती आणि विसर्जनाकरिता सुधारीत मार्गदर्शक तत्त्वे नुकतेच जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियमावलीनुसार केंद्राने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातली आहे. तर रंगकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ऑईल पेंट्स आणि इतर रंगावरदेखील निर्बंध घातले आहेत. या निर्णयामुळे गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुर्तिकारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याठिकाणी मे महिन्यातच मूर्तींचे काम सुरु करण्यात येते. त्यानुसार अनेकांनी कर्ज काढून मुर्तिकाम सुरु केले आहे. लाखोंच्या संख्येत मूर्ती सध्या ग्राहकांपर्यंत जाण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे या घडीला त्यांच्यात बदल करणे शक्य नसल्याने या मुर्तिकारांनी थेट दिल्ली दरबारी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन पाठवले आहे.

श्री गणेश मुर्तिकार आणि कल्याणकारी मंडळाचे श्रीकांत देवधर म्हणाले की, कोरोनामुळे ग्राहकांपर्यंत गणेशमूर्ती कशा पोहचवायच्या हा आमच्यासमोर प्रश्न आहे. अशावेळी केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने जाहीर केलेल्या नियमावलीमुळे आमच्यासमोर दुहेरी संकट ओढावले आहे. या सूचनांचा आम्हांला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे यंदाच्या ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवसाठी या नियमांची अंमलबजावणी करु नये. महत्त्वाचे म्हणजे, या नियमांची अमंलबजावणी करताना मुर्तिकारांची मते विचारात घेणे गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही प्रकाश जावडेकर यांच्याशी पत्रव्यवहार केला असून त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत असेही त्यांनी सांगितले.