
पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत आंबिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत अवैधरीत्या माती उत्खनन करण्यात आले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे व सरपंच नेहा प्रशांत पाटील यांनी तक्रार करून इटीएस यंत्राद्वारे मोजणीची मागणी केली होती. त्यानुसार मोजणी होऊन तीन महिने झाले असताना देखील बेकायदेशीर माती उत्खनन करणाऱ्यांवर अद्याप पर्यंत महसूल प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. पेण महसूल विभागातील अधिकारी अवैधरीत्या माती उत्खनन करणार्यांना पाठीशी घालत असल्यानेच ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे व सरपंच नेहा प्रशांत पाटील यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
मुंबई – गोवा महामार्गालगत आंबिवली गावाच्या हद्दीतील सर्वे नंबर 1 या आदिवासी जागेत मागील सहा महिन्यांपासून उरण येथील एन.जी.भोईर हे उत्खनन करत होते. त्यांनी नाममात्र रॉयल्टी शासना कडे भरून जून 2019 पर्यंत हजारो ब्रास मातीचे अवैधपणे उत्खनन करून ही माती खाजगी भरावसाठी नेली होती. या बाबतचे पुरावे म्हणून फोटो व व्हिडीओ शूटिंग पेण प्रांताधिकारी कार्यालयात त्या त्या वेळी दिले असल्याचे हरीश बेकावडे यांनी सांगितले.
दोनवेळा इटीएस मोजणी करण्याचा प्रयत्न केला गेला, पण दोन्ही वेळा मशीन बंद पडल्याचे कारण सांगून सदर मोजणी करण्यात आली नाही, मात्र 14 ऑगस्ट 2019 ला आंबिवली येथील या क्षेत्राची इटीएस यंत्राद्वारे मोजणी करण्यात आली. या मोजणी मध्ये या सर्व्हे नं 1 मधील 32 हजार 195 चौरस मीटर क्षेत्रामधून उत्खनन करत 1 लाख 82 हजार 21 ब्रास मातीचे उत्खनन केले असल्याचे निष्पन्न झाले.
या पैकी स्वतःच्या खाजगी माती भरावासाठी उरण येथील एन.जी.भोईर यांनी दोन हजार 254 चौरस मीटर क्षेत्रात उत्खनन करत 12 हजार 743 ब्रास मातीचे उत्खनन केले असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी अलिबाग रायगड यांचे कार्यालयातील सर्व्हेअर श्रीकांत खराडे यांनी केलेल्या इटीएस मशीन द्वारे मोजणीत निष्पन्न झाले आहे.तर मे.जे.एम.म्हात्रे यांनी 29 हजार 941 चौरस मीटर क्षेत्रात 1 लाख 69 हजार 278 ब्रास माती उत्खनन केले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


































































