‘निसर्ग’ चक्रीवादळाचा पेण तालुक्याला फटका, लाखो रुपयांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी

636

निसर्ग चक्रीवादळाचा पेण तालुक्याला जबरदस्त फटका बसला. या चक्रीवादळामुळे पेण तालुक्यातील अनेक घरांचे कौलांचे छप्पर, दुकानांचे, बिल्डिंग व सोसायट्यांचे पत्र्याचे छप्पर उडाले आहेत. दुपारी साधारण 1 ते 4 या वेळेत या निसर्ग चक्रीवादळाने पेण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. या वादळामुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी देखील प्रशासनाच्या दिलेल्या सूचनांचे पालन करीत घरात राहणे पसंत केल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

पेण शहरासह ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी विद्युत पोल पडले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडले आहेत.अ नेकांचे लाखो रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे. सुदैवाने या भयंकर वादळात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची नोंद नाही अशी माहिती पेण तहसीलदार अरूणा जाधव यांनी दिली.

जिल्हा प्रशासनासह पेणमधील स्थानिक प्रशासन देखील या वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले होते. पेण तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे नागरिकांनी घराबाहेर पडून नये याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पेण नगरपालिका हद्दीतील 71 नागरिकांसह तालुक्यातील वाशी, काळीश्री, विठ्ठलवाडी, बहीराम कोटक व गागोदे येथील एकूण 185 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

प्रशासनातर्फे 9 ॲम्बुलन्स, 2 जेसीबी, 2 पोकलेन, 1 टोइंगव्हॅन, 1 मिनीबस व 5 गाड्यांची व्यवस्था आपत्ती व्यवस्थापना करिता करण्यात आली आहे. सकाळपासूनच पेण तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या