पुरावा नसला तरी आधार कार्डवरचा पत्ता अपडेट करा, यूआयडीएआयची १ एप्रिलपासून नवीन सुविधा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आधार कार्डवरील पत्त्यात बदल करायचा असेल तर आता फारशी अडचण येणार नाही. यूआयडीएआय पुढील वर्षीपासून सेवेत बदल करणार आहे. ज्यांच्याकडे सध्याचा पत्ता सांगणारे पुरावे नसतील, त्यांच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. गोपनीय पिन असलेल्या अक्षरांमुळे हे शक्य होणार आहे.

यूआयडीएआयने मंगळवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. कुणाला आधार कार्डमधील पत्ता बदलायचा असेल आणि त्याच्याकडे पत्त्याचे पुरावे नसतील तर सिक्रेट पिन लेटरचा वापर करून अॅड्रेस व्हेरिफिकेशन रिक्वेस्ट पाठवता येईल. गोपनीय नंबर मिळाल्यानंतर त्याच्या माध्यमातून ऑनलाइन अॅड्रेस अपडेट करता येईल.

सध्याच्या अॅड्रेस अपडेटसाठी पासपोर्ट, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मॅरेज सर्टिफिकेट अशा ३५ कागदपत्रांपैकी एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावा लागतो. साधारणपणे भाड्याच्या घरात राहणारे किंवा फिरती नोकरी आहे, अशा लोकांना पत्ता अपडेट करण्यामध्ये अडचण येते. त्यामुळे ते आधारच्या माध्यमातून मिळणार्‍या सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत.

प्रायोगिक तत्त्वावर

यूआयडीएआयच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१९ पासून अॅड्रेस प्रूफ न देता आधार कार्डवरचा पत्ता अपडेट करण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या