
नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचा राजकीय मूड सांगितला आहे. अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाहीत तर पर्याय उपलब्ध करून न देण्याचा दोष आमचा आहे. आम्ही सर्व विरोधक यासाठी जबाबदार आहोत, असे पवार यांनी सांगितले.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी सद्य राजकीय स्थितीवर परखड भाष्य केले आहे. केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाहीत यावर बोलताना पवार म्हणाले, नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि सरकारमध्येही ते सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यावरून आम्ही टीकासुद्धा करत असतो, पण लोकांना आता नरेंद्र मोदी यांना पर्याय हवा आहे. आम्ही तो पर्याय देऊ शकतो असा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यात कुणाला यश मिळाले आहे का? असे पवार म्हणाले.
पर्याय उपलब्ध करून न देण्यासाठी सर्वस्वी विरोधक जबाबदार आहेत हे कबूल करून पवार म्हणाले, कुणीतरी जनतेच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे की, ‘अ’ (मोदी) हा चुकीचा आहे आणि ‘अ’ ला ‘ब’ (विरोधक) उत्तर देऊ शकतो. मी असे केले आहे आणि त्यानंतर लोकांचा मिळणारा पाठिंबाही अनुभवला आहे.
मोदी यांच्याशी बंद दाराआड झालेली चर्चा तुम्ही जगजाहीर केली हे चुकीचे असल्याची टीका होत आहे. यावर पवार म्हणाले, ती चर्चा लोकांना का समजू नये? आम्ही काही सरकारी गोपनीय गोष्टींवर चर्चा करत नव्हतो. ती काही गुप्त चर्चा नव्हती.
मोदींनी सत्तेबाबत ‘दुसरा’ पर्याय दिला होता
नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेची ऑफर राष्ट्रवादीला दिली होती आणि ती शरद पवार यांनी नाकारली हे विधान अर्धसत्य असल्याचे पवार यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले. ते म्हणाले, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचे ठरले होते तेव्हा मोदी यांनी ‘‘तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करा, आमच्यासोबत या’’ असे म्हटले होते. मी तेव्हा नम्रपणे ‘नाही’ म्हटले होते. माझा आणि माझ्या सहकार्यांचा याबाबत निर्णय झाला होता असे त्यांना सांगितले. मोदी यांनी तेव्हा फक्त मला ‘‘तुम्ही दुसरा विचार करा, पुनर्विचार करा, दुसरा पर्याय ठरवा’’ असे सांगितल्याचे पवार म्हणाले.
कांद्याचा इशारा दिला होता
तीन महिन्यांपूर्वी शेतकर्यांनी कांदा रस्त्यावर फेकला तेव्हा केंद्र सरकारने कांद्याला चांगला भाव दिला नाही. त्यामुळे शेतकरी दुसऱया पिकाकडे वळला. आता तुर्कीहून कांदा आयात केला जात आहे. ही सर्वस्वी केंद्र सरकारची चूक आहे. मी तीन महिन्यांपूर्वीच कांदा दरवाढीचा इशारा देणारे पत्र सरकारला लिहिले होते, असेही पवार यांनी सांगितले.

























































