ग्रामस्थांनी रस्त्यातच केली भात लागवड, खराब रस्त्यांमुळे सरपंच वैतागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इगतपुरी

तालुक्यातील बलायदुरी गावात पारदेवीकडे जाणार्‍या रस्त्यांची अवस्था चिखलमय झाली आहे. येथून हॉटेलकडे जाणार्‍या वाहनांमुळे रस्ते अधिकच खराब झाले आहेत.  रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम खाते दाद देत नसल्याने सरपंच कैलास भगत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रस्त्यात भात लागवड केली.

बलायदुरी येथील गुडघाभर चिखल असणार्‍या गावातील रस्त्यात चक्क भाताची लागवड करून अनोख्या मार्गाने संताप व्यक्त केला. स्वयंस्फूर्तीने ग्रामस्थांनी सरपंच कैलास भगत यांच्या नेतृत्वाखाली उग्र भाषेत निषेध करून भात लागवड केली.

इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी गावामध्ये गावातील रस्ते खराब झाले आहेत. दुरुस्तीसाठी वारंवार प्रयत्न करूनही अधिकारी दाद देत नाही. येथील हॉटेलकडे जाणार्‍या वाहनांमुळे रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. यामुळे रस्त्यांवर गुडघाभर चिखल तयार होतो. ग्रामस्थांना चिखलातून जावे लागते. यामुळे गावकर्‍यांचे आरोग्य कमालीचे बिघडून साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. अधिकार्‍यांचे वाढते दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरवर्षी हीच समस्या गावाच्या पाचवीला पुजलेली असल्याने सरपंच कैलास भगत यांच्या नेतृत्वाखाली योगिनाथ भगत, प्रकाश भगत, सुंदराबाई भगत, भाऊ भटाटे आदी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. गावातील रस्त्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क भात लागवड (आवणी) करत संताप व्यक्त केला.