
शिवसेनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमिवर राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ते शिवसेनेत असतानांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यासोबतच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारीच शिवसेना ओरिजन शिवसेना असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच निवडणुकांमध्ये लोकच हीच खरी शिवसेना असल्याचं दाखवून देतील असंही ते म्हणाले. त्याबरोबर राजकारण सुरूच असतं मात्र शिवसेनापमुख बाळासाहेब ठाकरे यांची ओरिजन शिवसेना ही अभेद्यच रहावी अशी मनापासून इच्छा असल्याचं ते यावेळी म्हणाले.
शिवसेनेच्या 57 वर्षांपैकी पहिली 25 मला आठवतात. शिवसेनेच्या पहिल्या मिटिंगपासून मी जायला लागलो. शाखाप्रमुख पहिले जे झाले त्यात मी एक होतो. मग अशा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही माझगाव, भायखळा, परळ, भोईवाडा, चेंबुरवरून आम्ही सारे शिवसैनिक ट्रक मधून मिळेल तसं घोषणा देत जायचो. 73 मध्ये मी नगरसेवक झालो पण 78 सालामध्ये शिवसेनेचा गटनेता झालो. तेव्हापासून शिवाजीपार्कच्या सभेमध्येसुद्धा मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलण्याची संधी द्यायला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणासोबत दत्ताजी साळवी, वामनाराव महाडिक, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी यांच्या बरोबरीनं मला सुद्धा बोलण्याची संधी मिळाली. तिथून पुढं शिवसेनेनं मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या, महापौर झालो, आमदार झालो. आता एक वाटतं शिवसेना फुटली हे काही मनाला अजूनही पटत नाही, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
अजूनही लोक शिवसेना फोडणाऱ्यांसोबत जात आहेत, प्रवाह चालूच आहे. हे काही समजत नाही. अडचणी येताहेत. आता शिवसेना कोण ? तर बाळासाहेब ठाकरेंची जी ओरिजनल शिवसेना (आता मध्यंतरी ज्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं ती नाही. ओरिजन शिवसेना…) तिच आमच्या मनात आहे आणि तिच कायम राहिल, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
तसंच खरी शिवसेना कोण? हे आता जेव्हा सर्वदूर वेगवेगळ्या निवडणुका होतील तेव्हा लोक ठरवतील की खरी शिवसेना ही आहे. आम्ही जरी उलट सुलट बोलत असलो, कायद्याच्या उलसुलट गोष्टी करत असलो तरी लोक घरात बसून हे ठरवत असतात की खरं काय आहे, चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे, असं भुजबळ म्हणाले. तोपर्यंत माझ्या सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र, असंही त्यांनी बोलून दाखवलं.
जूना शिवसैनिक म्हणून आताची परिस्थिती पाहून वाईट वाटतं. त्यावेळी त्यांची एकी, अभेद्य अशी एकजूट आणि कठीण प्रसंगात देखील बाळासाहेब ठाकरे उभे रहायचे आणि त्यांच्या बरोबरीने शिवसैनिक उभे राहायचे आणि बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला की हे करा मग कसं करू, काय करू, पोलीस येतील का अरेस्ट होईल का? असं काहीही नसायचं. साहेबांचा शब्द सुटला की डू ऑर डाय. हा एक पर्वलिचा शब्द घेऊन आम्ही निघायचो. हळूहळू शिवसेनेतून लोक काही कारणानं बाहेर पडले, मी, राज ठाकरे, राणे.. राजकारणात हे सुरू असतं. तरी देखील शिवसेना अभेद्य रहावी हे आजही मनापासून वाटतं, असं त्यांनी सांगितलं.



























































