परफ्युमचा वास घेतल्याने 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

711

आजच्या जगात टापटीप राहताना परफ्युम किंवा डिओड्रंट ही एक गरज झाली आहे. रोजच्या घामट आयुष्यात परफ्युममुळे सुगंध राहतो आणि त्याने मनही प्रफुल्लित राहतं. पण, हाच सुगंध एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. इंग्लंडमध्ये घडलेल्या घटनेमुळे ही बाब समोर आली आहे.

इंग्लंडमध्ये एका 13 वर्षांच्या मुलाचा डिओड्रंटमुळे मृत्यू झाला आहे. येथील नोरफॉल्क परगण्यातील जॅक वॅपल नावाच्या या मुलासोबत ही घटना घडली. त्याची आई सुझॅन वॅपल यांना काही काळापासून त्यांच्या परफ्युम आणि डिओच्या बाटल्यांमधून द्रव्य कमी होत असल्याचा संशय आला होता. तसंच काही बाटल्या गायब झाल्या होत्या. त्यांनी या बाबतीत तपास केला तेव्हा त्यांचा मुलगा जॅक याला डिओ किंवा परफ्युमचा वास घेण्याची सवय असल्याचं निदर्शनाला आलं.

सुझॅन यांनी जॅकला असं न करण्याबद्दल वारंवार बजावलं होतं. तेव्हा त्याने आईला ती बाहेर गेल्यानंतर तिची आठवण येते, तेव्हा ती लावत असलेल्या सुगंधाचा वास घेऊन तो मनाचं समाधान करत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसंच तो पुन्हा असं काही करणार नाही, असंही जॅकने तिला सांगितलं. जॅकच्या वडिलांनी त्याला डिओमधील एअरोसोल या घातक घटकाविषयी देखील सांगितलं.

पण, जॅकने त्याचीही सवय सोडली नाही. जॅकचा मृत्यू झाला, त्या दिवशीही त्याने डिओचा वास घेतला होता. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. जेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला बेशुद्धावस्थेत पडलेला पाहिलं तेव्हा त्यांनी त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. शवविच्छेदन अहवालातही अतिप्रमाणात डिओचा सुंगध घेतल्यामुळे एअरोसोल त्याच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचलं आणि त्यामुळे त्याच्या हृदयाला त्रास होऊन श्वसनाला अडथळे होऊ लागले. त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला.

आपली प्रतिक्रिया द्या