अंतराळ – ‘पर्सिव्हरन्स’मोहिमेचे यश

>> सुजाता बाबर

मंगळावरील जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी नासाने पाठवलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हरने महत्त्वाचा टप्पा ओलांडला. 18 फेब्रुवारी रोजी पर्सिव्हरन्स रोव्हरचे मंगळावर लँडिंग होत असतानाचा थरारक क्षण अवघ्या जगाने अनुभवला. संशोधकांना कायमच आकर्षित करणाऱया मंगळावरील ही मोहीम उत्कंठावर्धक असणार आहेच पण याबरोबरच जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या खुणांची उकलही या मोहिमेद्वारे होणार आहे.

मंगळ हा ग्रह संशोधकांना किती आकर्षित करतो हे काही नव्याने सांगायला नको. मंगळाचा खडकाळ पृष्ठभाग, त्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरच्या बर्फाळ टोप्या, मंगळावर सापडलेला पाण्याचा अंश ही सगळी कारणे आपल्याला मंगळाचा अजून शोध घेण्यासाठी सतत प्रेरणा देत असतात. यात अनेक देश मंगळावर मोहिमा पाठवितात. आपण पाठवलेले मंगळयान ही मोहीमदेखील यशस्वी झालेली होती. आता लवकरच मंगळावर मानवी मोहिमा जातील, परंतु मानवाने मंगळावर पाऊल टाकण्याआधी तेथे परजिवांच्या अस्तित्वाचा शोध आणि मंगळ ग्रह मानवाने राहण्यायोग्य कसा आहे आणि त्यावर सूक्ष्म जिवांची काही चिन्हे आहेत का हे तपासणे हा शोध महत्त्वाचा आहे.

कोविडच्या सावटाखाली असताना नुकतेच नासाने त्यांचे पर्सिव्हरन्स हे यान मंगळावर यशस्वीपणे उतरवले आणि खगोल जगतामध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यान उतरण्याचे थरारक नाटय़ सर्वांना प्रत्यक्ष पाहायला मिळाले. मार्स पर्सिव्हरन्स रोव्हर मिशन ही नासाच्या मंगळ ग्रह अन्वेषण या मोठय़ा उपक्रमाचा एक भाग आहे. या मोहिमेच्या यशावर अवलंबून पुढे मंगळावरील बर्फाच्या टोप्यांचा अभ्यास करण्यासाठी 2026 मध्ये रोबॉटिक मोहीम (मार्स आइस मॅपर) पाठविण्यात येणार आहे.

भविष्यातील मानवी मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञान काय लागेल, मानवाच्या वास्तव्यासाठी तिथे कोणती आव्हाने आहेत, मंगळावर ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी काय करावे लागेल, पाण्यासारखी संसाधने कुठे आहेत, तेथील हवामान, धूळ यांची वैशिष्टय़े असे अनेक शोध या मोहिमेद्वारे घेतले जाणार आहेत. 30 जुलै 2020 मध्ये हा रोव्हर प्रक्षेपित केला आणि तब्बल साडेसहा महिन्यांनी 18 फेब्रुवारी 2021 रोजी तो मंगळावरील जेझेरो क्रेटरमध्ये यशस्वीपणे उतरला. या मोहिमेचा कालावधी साधारण एक मंगळ वर्ष म्हणजे 687 पृथ्वी दिवस आहे. पर्सिव्हरन्सच्या मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वी प्रक्षेपण आणि लँडिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे ते तंत्रज्ञान. मंगळावर याआधीही यशस्वी उड्डाणे झालेली आहेत. या मोहिमेमध्ये पॅराशूट, अवरोहण वाहन आणि लँडिंगच्या आधीच्या शेवटच्या सेकंदाच्या वेळेस ‘स्कायक्रेन युक्ती’ नावाची पध्दती वापरली होती. या प्रकारामध्ये जड रोव्हर पृष्ठभागावर उतरवण्यासाठी उपयोगी असतो. असेच लँडिंग पूर्वी पाठविलेल्या क्युरिऑसिटीच्या लँडिंगवेळी उपयोगी ठरले होते. यामध्ये टेर्रेन रिलेटिव्ह नेव्हिगेशन (टीआरएन) हे नवीन तंत्रज्ञान जोडले होते. ही अत्याधुनिक नेव्हिगेशन प्रणाली मंगळाच्या वातावरणातील रोव्हरला उतरण्याकरिता धोकादायक भूभाग शोधून तो टाळण्यास मदत करते. याला मायक्रोफोन लावलेला असतो, जो रोव्हरचा आवाज शास्त्र्ाज्ञांपर्यंत पोहोचवतो. या आवाजावरून शास्त्र्ाज्ञांना रोव्हर व्यवस्थित आहे की नाही, त्याचे लँडिंग सुरक्षित होते आहे की नाही हे समजते.

पर्सिव्हरन्सची मंगळावर फिरण्याची क्षमता बरीच मोठी आहे. तो साधारण 5 ते 20 किलोमीटर फिरू शकतो. यावेळी प्रथमच रोव्हरने सोबत ड्रिल नेले आहे. हा रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर ड्रिल करून तेथील खडक व मातीचे नमुने साठवणार आहे. नमुने गोळा करण्याची, साठवण्याची आणि जतन करण्याची क्षमता असणारा हा पहिला रोव्हर आहे. मंगळावरील वातावरणात 90 टक्के कार्बन डायऑक्साईड आहे. त्यापासून ऑक्सिजन कसा तयार करता येईल हे तपासण्याची ही संधी आहे. या अभ्यासामुळे मंगळावर मानवाचे वास्तव्य आणि दळणवळण कसे असेल हे समजण्यासाठी हा रोव्हर मदत करेल.

गंमत म्हणजे पर्सिव्हरन्स पाठवण्यापूर्वी त्यावर पृथ्वीवासीयांची नावे लिहिण्यासाठी एक जाहीर आवाहन केले होते. त्यामध्ये जवळपास एक करोड दहा लाख नावे लिहिली गेली. याचप्रमाणे या मोहिमेतील रोव्हरला नावे सुचविण्याचे आवाहनदेखील करण्यात आले होते. सातवी इयत्तेमधील अलेक्झांडर मेदर या मुलाने सुचविलेले ‘पर्सिव्हरन्स’ म्हणजे चिकाटी, दृढता हे नाव रोव्हरकरिता अंतिम करण्यात आले. 11वी मधील वानिझा रुपानी या मूळ हिंदुस्थानी वंशाच्या मुलीने सुचविलेले ‘इंजेन्युईटी’ म्हणजे चातुर्य, हुशारी हे नाव रोव्हरसोबत पाठविलेल्या हेलिकॉप्टरला दिले आहे.

पर्सिव्हरन्स रोव्हरचे लँडिंग पाहत असताना तेथील आवाज ऐकताना जणू काही मंगळाचा श्वास ऐकत आहोत असा भास होत होता. या मोहिमेचे सर्वात अनोखे वैशिष्टय़ म्हणजे त्यावर पाठवलेले हेलिकॉप्टर! याचे नाव ‘इंजेन्युईटी’ असले तरी त्याला प्रेमाने ‘जिनी’ असे म्हटले जाते. हा एक लहानसा ड्रोन आहे. त्यावर बसविलेला कॅमेरा आपल्याला मंगळाच्या पृष्ठभागाचे तपशील पाठवील. पृथ्वी सोडून प्रथमच इतरत्र कुठे हेलिकॉप्टर उडणार असेल तर ते मंगळावर! ते साधारण पाचवेळा उड्डाण करील अशी रचना केलेली आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर साधारण 10 ते 16 फूट उंच हे उड्डाण असेल. मंगळावर वातावरणीय दाब हा पृथ्वीच्या 0.60 टक्के आहे. जिनीच्या यशस्वी उड्डाणाने अनेक नवीन मैलाचे दगड रचले जातील. तसेच हे उड्डाण यशस्वी झालेच तर 30 दिवसांमध्ये पाच उड्डाणांचे नियोजन केले गेले आहे.

मंगळाच्या वातावरणात शिरल्यावर अवघ्या चार मिनिटांच्या आत हे नयनरम्य आणि थरारक उड्डाण आपल्याला दिसू लागले होते. हा विलक्षण क्षण होता. या क्षणाचे धावते वर्णनदेखील तितकेच उत्कट होते. हा रोव्हर उतरवला होता मूळ हिंदुस्थानी असलेल्या स्वाती मोहन या वैज्ञानिकेने! डॉ. स्वाती मोहन या मार्स 2020 मोहिमेच्या मार्गदर्शन, नेव्हिगेशन आणि नियंत्रण ऑपरेशन्सच्या प्रमुख होत्या. रोव्हर अगदी शेवटच्या क्षणाला जेव्हा उतरतो तो क्षण खूप महत्त्वाचा असतो. अनेक उड्डाणे याच क्षणी अयशस्वी होतात, परंतु पर्सिव्हरन्स मात्र यशस्वी झाला! डॉ. स्वाती मोहन यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘‘पर्सिव्हरन्सने मंगळावरील जीवनाचा वेध घ्यायला सुरुवात केली आहे.’’

n [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या